नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा, खासगी रुग्णालयातील बंद लसीकरण व १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी लसीकरण थांबविण्यात आल्याने लसीकरणाचा वेग मंदावल्याचे नागपूर जिल्ह्यातील चित्र आहे. परंतु जून महिन्यापासून हे चित्र बदलण्याची दाट शक्यता आहे. काही खासगी रुग्णालयांनी खासगी लसीकरणासाठी लस उत्पादक कंपन्याना ऑर्डर देऊन ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे, यात ‘कोविशिल्ड’ सोबतच रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लसीचा समावेश आहे.
नागपूर शहरात लसीकरणाचे जवळपास २०७ केंद्र आहेत. दरम्यानच्या काळात खासगी रुग्णालयांना महानगरपालिकेने लस देणे बंद केल्याने शंभरावर केंद्र बंद पडले आहेत. यामुळे शुल्क मोजून लस घेणाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. याची दखल घेऊन शहरातील काही खासगी हॉस्पिटलने विशेषत: ‘कोविशिल्ड’ लसींसाठी थेट कंपनीशी संपर्क साधला आहे. प्राप्त माहितीनुसार, कंपनीने २४ मेनंतर या हॉस्पिटल्सना मागणीनुसार साठा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. आता या लसीच्या पुरवठ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धंतोली येथील एका खासगी रुग्णालयाने रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ लसीसाठी संबंधित कंपनीशी संपर्क साधला आहे. प्राप्त माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनाने लसीची मोठी ऑर्डर देण्यासाठी काही मोठ्या कंपन्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. यात किती यश आले हे पुढील महिन्यात दिसून येणार आहे.
-सरकारचा कोटा संपल्यावर मिळणार लस
शहरातील काही मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोना लसींच्या उत्पादन कंपनीशी संपर्क साधला आहे. परंतु जोपर्यंत सरकारचा कोटा पूर्ण होणार नाही तोपर्यंत खासगी रुग्णालयांना लस मिळणार नसल्याचे मेसेज संबंधित कंपनीकडून प्राप्त झाले आहेत. परंतु जून महिन्यापासून कंपनीकडून लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नागपूरकरांना याचा मोठा फायदा होईल.
डॉ. अनुप मरार, संयोजक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन