‘एनपीए’घेऊनही खासगी प्रॅक्टिस धडाक्यात; रुग्णसेवेला बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:03 PM2020-12-01T12:03:16+5:302020-12-01T12:03:42+5:30

Nagpur News health मेयो, मेडिकल, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेन्टल), महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील काही डॉक्टर शासकीय रुग्णालयाला कमी वेळ देऊन खासगी प्रॅक्टिसकडेच अधिक लक्ष देत असल्याचे चित्र आहे.

Private practice in spite of NPAs; A blow to the patient service | ‘एनपीए’घेऊनही खासगी प्रॅक्टिस धडाक्यात; रुग्णसेवेला बसतोय फटका

‘एनपीए’घेऊनही खासगी प्रॅक्टिस धडाक्यात; रुग्णसेवेला बसतोय फटका

googlenewsNext
ठळक मुद्देमेयो, मेडिकल, डेन्टल, मनपा रुग्णालयामधील काही डॉक्टरांचा समावेश

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : खासगी प्रॅक्टिसवर निर्बंध आणण्यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या व्यवसायरोध भत्त्यात (एनपीए) वाढ करून हा भत्ता घेणे बंधनकारक केले. परंतु मेयो, मेडिकल, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय (डेन्टल), महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील काही डॉक्टर शासकीय रुग्णालयाला कमी वेळ देऊन खासगी प्रॅक्टिसकडेच अधिक लक्ष देत असल्याचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे, याची माहिती वरिष्ठांपासून सर्वांनाच आहे. याविषयी मात्र कुणीच जाब विचारत नाही. परिणामी, दिवसेंदिवस शासकीय रुग्णालयांची रुग्णसेवा ढासळत चालली आहे.

शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करायची नसेल त्यांच्यासाठी पूर्वी मूळ पगाराच्या २५ टक्के व्यवसायरोध (नॉन प्रॅक्टिस अलाऊन्स) दिला जात असे. २०१२ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) सुधारित शासनादेशाद्वारे व्यवसायरोध भत्त्यात १० टक्क्याने वाढ करीत ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता केला. हा भत्ता घेणे बंधनकारकही केले. या निर्णयाच्या विरोधात काही डॉक्टर न्यायालयात गेले. ‘स्टे’ मिळविला.

मात्र, हा ‘स्टे’ काही वैयक्तिक प्रकरणातच आहे. परंतु याचा फायदा इतरही डॉक्टर घेत आहेत. यातील काहींची स्वत:ची खासगी इस्पितळे आहेत तर काही कॉर्पाेरेट व इतरांच्या खासगी इस्पितळात सेवा देत आहेत. यामुळे शासकीय रुग्णालयाच्या ‘ओपीडी’च्या वेळेत न पोहचणे. विशिष्ट रुग्णांनाच तपासणे. उशिरा येऊन लवकर जाणे. रुग्णालयाच्या वेळेत खासगी प्रॅक्टिससाठी निघून जाणे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमध्ये वळविणे आदी प्रकार वाढल्याचे चित्र आहे.

-अनेक खासगी इस्पितळे शासकीय डॉक्टरांच्या भरवशावर

शहरात खासगी रुग्णालयांची संख्या ६४० वर गेली आहे. ही संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरवर्षी एक-दोन मोठी रुग्णालये उघडत आहेत. यातील अनेक खासगी इस्पितळे या शासकीय डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहेत. विशेष म्हणजे, यावर प्रतिबंध घालण्यासाठी रुग्णालयात ‘बायोमेट्रिक’ आहे. परंतु या तंत्रज्ञानाची कुणी माहितीच घेत नसल्याने व कारवाई होत नसल्याने सर्वकाही ‘ऑलबेल’ असल्याचे दिसून येत आहे.

‘डीएमईआर’अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करू नये. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन माहिती पाठविण्यास सांगितले होते. जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही. दरम्यान, सर्व अधिष्ठात्यांनाही खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांची नावे मागितली होती. त्याचा पाठपुरावा केला जाईल.

- डॉ. तात्याराव लहाने

संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

 

१) ओपीडी संपताच खासगी हॉस्पिटल गाठतात.

मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुमारे ७५ टक्क्याहून जास्त डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात. ओपीडीची वेळ संपत नाही तोच आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. काही रुग्णालयीन वेळा पाळून उर्वरित वेळ आपल्या खासगी प्रॅक्टिसला देतात.

२) दुपारनंतर निवासी डॉक्टरांच्या भरवशावर रुग्ण.

मेयोमध्ये ७० टक्के खाटा कोविड रुग्णांच्या सेवेत आहेत. यामुळे या रुग्णांच्या सेवेत नसलेल्या व खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. विशेष म्हणजे, दुपारनंतर तर मोजकेच डॉक्टर रुग्णालयात दिसतात. रुग्णांचा संपूर्ण भार निवासी डॉक्टरांवर येतो.

३) डेन्टलमध्ये ओपीडीनंतर खासगी सेवा

डेन्टलमध्ये मात्र मेयो व मेडिकलपेक्षा वेगळे चित्र आहे. ओपीडीची वेळ सांभाळून नंतर खासगी प्रॅक्टिसला वेळ देतात. काही डॉक्टर आपल्या पत्नीच्या क्लिनिकमधून सेवा देतात, तर काही कॉर्पाेरेट इस्पितळांमधून खासगी सेवा देतात.

Web Title: Private practice in spite of NPAs; A blow to the patient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.