Private hospitals to report pneumonia patients: Collector Thackeray | खासगी इस्पितळांनी न्यूमोनिया रुग्णांची माहिती द्यावी :  जिल्हाधिकारी ठाकरे

खासगी इस्पितळांनी न्यूमोनिया रुग्णांची माहिती द्यावी :  जिल्हाधिकारी ठाकरे

ठळक मुद्देआयएमए व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनशी चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : खासगी इस्पितळात भरती असलेल्या प्रत्येक न्यूमोनिया व कोरोना संशयित रुग्णांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याची सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. शुक्रवारी उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी खासगी इस्पितळांचा आढावा घेतला.
या बैठकीला आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला,विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट व आॅरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे यांनी खासगी इस्पितळांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यात खासगी डॉक्टर, इस्पितळ व त्यांच्या मनुष्यबळाची कशी मदत होईल यावर चर्चा केली. डॉ. झुनझुनवाला यांनी ‘आयएमए’कडून सर्व डॉक्टरांना, पॅथॉलॉजी लॅब संचालकांना व रेडिओलॉजिस्टना आपले केंद्र सुरू ठेवण्याचे आवाहन केल्याची माहिती दिली. अनेक बंद असलेले हॉस्पिटल सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. अरबट यांनी खासगी इस्पितळांमधील ५० टक्के स्टाफ येत नसल्याचे आणि सुरक्षा साधनांच्या तुटवड्याची समस्या मांडली.
खासगी इस्पितळात कोव्हीड-१९ च्या संशयित व बाधित रुग्ण किंवा न्यूमोनियाचा रुग्ण आल्यास याची माहिती कुणाला द्यावी, याविषयावरही चर्चा करून जिल्हाधिकारी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Private hospitals to report pneumonia patients: Collector Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.