अल्पवयीन मुलीसोबत पळालेल्या आरोपीला कारावासात सूट
By Admin | Updated: November 18, 2015 03:11 IST2015-11-18T03:11:37+5:302015-11-18T03:11:37+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीसोबत पळालेल्या आरोपीला कारावासात सूट दिली आहे.

अल्पवयीन मुलीसोबत पळालेल्या आरोपीला कारावासात सूट
हायकोर्ट : मुलीची पळून जाण्यास होती सहमती
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीसोबत पळालेल्या आरोपीला कारावासात सूट दिली आहे. मुलगी स्वमर्जीने आरोपीसोबत गेली होती. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी या प्रकरणावर निर्वाळा दिला.
रामकुमार ऊर्फ दुर्गेश लोटनप्रसाद सोनी (३१) असे आरोपीचे नाव असून, तो मध्य प्रदेश येथील मूळ रहिवासी आहे. त्याचे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते.
त्यावेळी मुलगी १४ वर्षांची होती. ते दोघेही १० आॅक्टोबर २००९ रोजी पळून शिर्डी (अहमदनगर) येथे गेले व भाड्याच्या खोलीत पती-पत्नीप्रमाणे राहायला लागले. आरोपी संसार चालविण्यासाठी व्यवसाय करीत होता. ते दोन वर्ष एकत्र राहिले.
पोलिसांनी आरोपीला १५ सप्टेंबर २०११ रोजी अटक केली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर नागपूर सत्र न्यायालयात खटला चालला. ३० जानेवारी २०१३ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३६३(अपहरण), ३६६-अ(अल्पवयीनाचे अपहरण) व ३७६(अत्याचार)अंतर्गत दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. आरोपी १५ सप्टेंबर २०११ पासून म्हणजे चार वर्षांपासून कारागृहात आहे.
यादरम्यान त्याने पॅरोल किंवा फर्लोचा एकदाही लाभ घेतलेला नाही. मुलगी स्वमर्जीने त्याच्यासोबत पळाली होती. ही विचित्र परिस्थिती पाहता न्यायालयाने आरोपीचा दोष कायम ठेवला, पण त्याने आतापर्यंत भोगला तेवढा कारावास पुरेसा मानून त्याला मुक्त करण्याचा आदेश दिला तसेच दंडाची शिक्षा माफ केली. (प्रतिनिधी)