कैदीही करणार ‘एटीएम’ने ‘पेमेंट’
By Admin | Updated: January 28, 2016 03:13 IST2016-01-28T03:13:58+5:302016-01-28T03:13:58+5:30
तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा आता एटीएम कार्डने खरेदी करू शकतील. एसबीआयने तुरुंगातील कैद्यांना खातेधारक बनवून एटीएम कार्ड उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे.

कैदीही करणार ‘एटीएम’ने ‘पेमेंट’
एसबीआयचे बनले खातेधारक : नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगातून पायलट प्रोजेक्टला सुरुवात
नागपूर : तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदीसुद्धा आता एटीएम कार्डने खरेदी करू शकतील. एसबीआयने तुरुंगातील कैद्यांना खातेधारक बनवून एटीएम कार्ड उपलब्ध करून दिल्याने हे शक्य झाले आहे. बुधवारी तुरुंग परिसरात आयोजित एका कार्यक्रमात कैद्यांना पासबुक आणि एटीएम कार्ड वितरित करण्यात आले.
नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात सुरू करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टला राज्यातील नऊ केंद्रीय तुरुंगात लागू करण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) डॉ. बी.के. उपाध्याय हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच अधीक्षक योगेश देसाई, एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक बी. शंकर आणि सहायक महाव्यवस्थापक आलोक सिन्हा प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत असलेले जवळपास ८०० कैदी आहेत. तुरुंगात या कैद्यांकडून मजुरी करवून घेतली जाते. त्या मोबदल्यात त्यांना दिवसाप्रमाणे मजुरीसुद्धा दिली जाते; ती ४५ रुपये, ५० रुपये आणि ५५ रुपये अशी असते. ही मजुरीची रक्कम त्यांच्या नावाने तुरुंगातच जमा होत असते. त्यांना परिवाराकडूनसुद्धा एक ठराविक आर्थिक मदत मिळत असते. कैद्यांना कॅन्टीनच्या माध्यमातून खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तूंची विक्री केली जाते. त्यांना एका महिन्यात दोन हजार रुपये खरेदी करण्याचे अधिकार असतात. है पैसे कैद्यांच्या नावाने जमा असलेल्या निधीमधून वसूल केले जाते. या कामासाठी कैद्यांचा लेखाजोखा सांभाळून ठेवण्यात आणि इतर कामांमध्ये खूप वेळ खर्ची पडतो. त्यामुळे डॉ. उपाध्याय यांनी महासंचालकपद स्वीकरताच कैद्यांना एसबीआयचे खातेधारक करण्याची योजना आखली, त्यांनी एसबीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात ही योजना सुरू केली. बुधवारी कैद्यांना पासबुकसह एटीएम कार्ड वितरित करण्यात आले. यानंतर मजुरीची रक्कम कैद्यांच्या खात्यात थेट जमा होईल. कैद्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मनीआॅर्डर पाठविण्याऐवजी थेट बचत खात्यात पैसे जमा करता येतील. तुरुंगातील कॅन्टीनमधून काही खरेदी केल्यास कैदी एटीएमद्वारे पेमेंट करतील. यासाठी कॅन्टीनमध्ये ‘स्वॅपिंग मशीन’ लावण्यात आली आहे. सध्या दोन हजार रुपयांची मर्यादा आहे. त्याला अडीच हजार रुपयापर्यंत वाढविण्यात येत आहे.
कैद्यांना एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर मात्र कैदी आपल्या पत्त्याचे दस्ताऐवज सादर करून हे खाते नियमित करू शकतील. सध्या १५० कैद्यांना पासबुक व एटीएम कार्ड देण्यात आले आहेत. राज्यात नऊ केंद्रीय तुरुंग आहेत. यात १० हजारावर शिक्षा भोगत असलेले कैदी आहेत. नागपुरातील यशानंतर सर्वांनाच यात सामील केले जाईल. (प्रतिनिधी)