शांतिवनातील वस्तू संग्रहालयाचे आचारसंहितेपूर्वी लोकार्पण : राजकुमार बडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:37 IST2019-06-03T23:35:22+5:302019-06-03T23:37:39+5:30

शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या नवनिर्मित अत्याधुनिक इमारती परिसरातील विविध वास्तूंचे लोकार्पण कुठल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.

Prior to code of conduct Shantivan museum will inaugurate : Rajkumar Badole | शांतिवनातील वस्तू संग्रहालयाचे आचारसंहितेपूर्वी लोकार्पण : राजकुमार बडोले

शांतिवनातील वस्तू संग्रहालयाचे आचारसंहितेपूर्वी लोकार्पण : राजकुमार बडोले

ठळक मुद्देदीड महिन्यात काम संपविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या नवनिर्मित अत्याधुनिक इमारती परिसरातील विविध वास्तूंचे लोकार्पण कुठल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी केला.
शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व प्रकल्पातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शांतिवन चिचोली येथील काम प्रगतिपथावर आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे कामांचा आढावाही घेण्यात येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्याचे लोकार्पण केले जाईल. त्याचप्रकारे उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर याचे कामही बरेच रेंगाळले आहे. दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. ते काम तातडीने व्हावे असे आपले प्रयत्न आहे. या सर्व कामांचा आढावा आपण आज घेत असून, अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शांतिवन चिचोली येथील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा. त्यासाठी जास्तीचे मजूर लावा. परंतु कोणत्याही परिस्थितीत येथील कामे दीड महिन्यात संपायलाच हवी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत दीक्षाभूमीच्या विकास कामांचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीत नासुप्रचे वास्तू विशारद संदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.
समता प्रतिष्ठानचे कार्यालय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हलवा
उत्तर नागपुरातील १२५ कोटी रुपयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचे काम संथगतीने सुरू आहे. दोनवेळा मुदतवाढ मिळली आहे, तरीही काम पूर्ण झालेले नाही. या कन्व्हेन्शन सेंटरचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे कार्यालय तिथे सुरू करा, असे निर्देशही राजकुमार बडोले यांनी यावेळी दिले. तसेच संत चोखामेळा वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन या महिन्याच्या शेवटी सुरू करा, असे निर्देशही दिले.

Web Title: Prior to code of conduct Shantivan museum will inaugurate : Rajkumar Badole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.