पंतप्रधानांचा दौरा दोन तास लांबणार ?
By Admin | Updated: April 9, 2017 02:36 IST2017-04-09T02:36:47+5:302017-04-09T02:36:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात येत आहेत. त्यांचे नागपुरात सकाळी १०.४० वाजता आगमन होईल, ....

पंतप्रधानांचा दौरा दोन तास लांबणार ?
पुण्यात त्याच वेळी राष्ट्रपतींचा दौरा : भाजपातर्फे २५ हजारांच्या उपस्थितीचे लक्ष्य
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात येत आहेत. त्यांचे नागपुरात सकाळी १०.४० वाजता आगमन होईल, असा प्राथमिक दौरा प्रशासनाने आखला होता. मात्र, त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजता पुण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन होत आहे. यामुळे पंतप्रधानांचा नागपूर दौरा दोन तास लांबण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती व पंतप्रधान यांना उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. राज्य व देशपातळीवरील सुरक्षा यंत्रणेला अलर्ट रहावे लागते. १४ एप्रिल रोजी पुण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तर नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे. प्राप्त माहितीनुसार या दोन्ही ठिकणाची आगमनाची वेळ सकाळी १०.३० ते १०.४० च्या दरम्यानची आहे. राष्ट्रपतींचे राज्यात आगमन होणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पुण्यात स्वागतासाठी उपस्थित रहावे लागणार आहे. या सर्व तांत्रिक बाजू पाहता पंतप्रधान मोदी यांचा नागपूर दौरा दोन तास लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोदी यांचे आता दुपारी १२.४५ ते १.१५ च्या दरम्यान नागपुरात आगमन होईल, अशा हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. दौऱ्याबाबत प्रशासनातर्फे अधिकृत वेळ जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, नागपूर शहर व भाजपातर्फे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. शनिवारी पक्षाच्या मंगलम, गणेशपेठ येथील कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित होते. मानकापूर क्रीडा संकुल येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेला शहर व जिल्ह्यातील सुमारे २५ हजार लोक उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तयारासाठी १० ते १२ एप्रिल दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय मंडळांच्या बैठका घेतल्या जातील. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)