पंतप्रधान नरेंद्र मोदी हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:24+5:302021-01-17T04:09:24+5:30

बाळासाहेब थोरात यांची टीका : काँग्रेसचा नागपुरातील राजभवनाला ट्रॅक्टरने घेराव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

This is Prime Minister Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे

बाळासाहेब थोरात यांची टीका : काँग्रेसचा नागपुरातील राजभवनाला ट्रॅक्टरने घेराव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम झाले असून, ते आता या देशातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनाच भांडवलदारांचे गुलाम करायला निघाले आहेत, अशी जाहीर टीका राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केली.

केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसतर्फे राजभवनाला ट्रॅक्टरसह घेराव घालण्यात आला. या आंदोलनात नेत्यांसह हजारो कार्यकर्ते ट्रॅक्टरसह सभागी झाले होते. यावेळी राजभवनासमोर किसान अधिकार दिन सभा आयोजित करण्यात आली. त्यात थोरात पुढे म्हणाले, केंद्राचे कृषी कायदे हे नफेखोर व साठेबाजांसाठी तयार करण्यात आले आहे. ५२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थंडीत आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले. परंतु, केंद्र सरकारला त्यांची किवही येत नाही. केंद्राचे कायदे आपण मोडून काढू. हे आंदोलन इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुआ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, खा. बाळू धानोरकर, माणिकराव ठाकरे,यांनीही मनोगत व्यक्त करीत केंद्र सरकारला धारेवर धरले. आंदोलनात चंद्रकांत हांडोरे, नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. अभिजित वंजारी, प्रदेश सचिव नाना गावंडे, मुन्ना ओझा, अतुल कोटेचा, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. राजू पारवे, मुज्जफ्फर हुसैन, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, आ. प्रतिभा धानोरकर, अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, कुंदा राऊत, अमोल देशमुख, विलास अवतारे, एस.क्यू. जामा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

राजभवनात घुसण्याचा प्रयत्न

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू असताना आ. विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक, आ. अभिजित वंजारी यांनी कार्यकर्त्यांसह राजभवनच्या पश्चिम गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. राजभवनाच्या चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते. पोलिसांनी तिघांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.

महिला कार्यकर्त्यांनी पेटवल्या चुली

पेट्रोल-डिझेलसह वाढत्या महागाईच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर चुली पेटवून आंदोलन केले. पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घेण्याची त्यांनी मागणी केली.

Web Title: This is Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.