दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
By Admin | Updated: April 7, 2017 02:59 IST2017-04-07T02:59:26+5:302017-04-07T02:59:26+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.

दीक्षाभूमीवरील टपाल तिकिटाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
दर्शनासोबतच व्हावा जाहीर कार्यक्रम : स्मारक समितीचा प्रयत्न
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत. यावेळी दीक्षाभूमीवर काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. या लोकार्पणासाठी दीक्षाभूमीवर पंतप्रधानांचा छोटेखानी जाहीर कार्यक्रम व्हावा, असा प्रयत्न दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने केला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील महू येथून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाची सुरुवात केली. वर्षभर कार्यक्रम जाहीर करण्यात आले. या महोत्सवाची सांगता दीक्षाभूमीवर पंतप्रधानांच्याच उपस्थितीत व्हावी, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
त्यासाठी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या वतीने समितीचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्यात आले. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे हे स्वत: हे निवेदन घेऊन गेले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट द्यावी, यासाठी विशेष पाठपुरावा केला. अखेर या सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले.
‘दीक्षाभूमी’वर टपाल तिकीट काढण्यात यावे, यासाठी दलित मित्र भूषण दडवे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
शासनाने याची दखल घेत दीक्षाभूमीवर टपाल तिकीट काढले आहेत. परंतु याचे लोकार्पण व्हायचे आहे. ते दीक्षाभूमीवरच पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. खूप मोठा कार्यक्रम न घेता दीक्षाभूमीवरील नवीन सभागृहात हा लोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम व्हावा, अशी स्मारक समितीची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.(प्रतिनिधी)
स्मारक समिती करणार पंतप्रधानांचा सत्कार
दीक्षाभूमीला सदिच्छा भेट देणाऱ्या गणमान्य अतिथींचे स्मारक समितीच्यावतीने स्वागत केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. तसेच दीक्षाभूमीची आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह भेट दिले जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. यावेळी मध्यवर्ती स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धांचा पुतळा परिसर आदींची पाहणी करण्यात आली.