जीवन-मृत्यूचा ‘अनमोल’ संघर्ष - रक्त कर्करोगाशी लढा :

By Admin | Updated: May 29, 2015 02:13 IST2015-05-29T02:13:59+5:302015-05-29T02:13:59+5:30

प्रखर इच्छाशक्ती आणि जिद्द असली तर कठीण परिस्थितीतूनही खडतर यशाचा मार्ग प्रशस्त होतो.

'Priceless' struggle for life-death - Fight against blood cancer: | जीवन-मृत्यूचा ‘अनमोल’ संघर्ष - रक्त कर्करोगाशी लढा :

जीवन-मृत्यूचा ‘अनमोल’ संघर्ष - रक्त कर्करोगाशी लढा :

दहावीत मिळविले ९५ टक्के गुण
नागपूर : प्रखर इच्छाशक्ती आणि जिद्द असली तर कठीण परिस्थितीतूनही खडतर यशाचा मार्ग प्रशस्त होतो. जीवन आणि मृत्यूचा संघर्ष करणाऱ्या अनमोल केशव हिंगे याच्या यशाची कथाही विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारी आहे. फेब्रुवारी महिन्यातच अनमोलला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि हिंगे कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. पण अनमोलने जिद्द सोडली नाही. तो निराश झाला नाही. कर्करोगावर मात करीत केमोथेरपीच्या जीवघेण्या वेदना सहन करीतच उपचारादरम्यान त्याने व्रतस्थ अभ्यास केला. परिश्रम आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर अनमोलने इयत्ता दहावीच्या सीबीएसई परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त करून यश मिळविले आहे.
ध्येयाच्या इच्छाशक्तीनेच मिळाले यश
सेंटर पॉर्इंट शाळा, वर्धमाननगर येथे शिकणाऱ्या अनमोलला मागील वर्षी डेंग्यू झाला होता. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. पण आजारातून बरा झाल्यावर पुढच्याच महिन्यात त्याला पुन्हा डेंग्यू झाला. त्यात डिसेंबर २०१४ रोजी त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे कळले. यामुळे अनमोल निराश झाला; पण ध्येयाने झपाटलेल्या अनमोलने आशा सोडली नाही. अनमोलच्या स्थितीने त्याच्या पालकांचे अवसानच गळाले. त्यांनी ब्लड कॅन्सरचे विशेषज्ञ डॉ. अवतारकृष्ण गंजू यांच्याशी संपर्क करून अनमोलवर केमोथेरपीचे उपचार सुरू केले. मागील साडेतीन महिन्यांपासून त्याच्यावर हे उपचार सुरू आहेत. त्याची आई अलका जिल्हा परिषदेत शिक्षिका आहे. वडील केशव पवनीच्या जयसेवा आदर्श हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहेत. त्याला एक मोठा भाऊ आहे. (प्रतिनिधी)
...अन् आशेचा किरण दिसला!
अनमोलला रक्ताचा कर्करोग झाल्याचे कळल्यावर आम्हाला धक्काच बसला. अनमोलही हे कळल्यावर निराश झाला. पण त्याची अभ्यासाची जिद्द कायम होती. परीक्षा सुरू असतानाही त्याला केमोथेरपीसीठी भरती करण्यात आले होते. त्याची अभ्यासाची जिद्द पाहून डॉ. गंजू, त्याचे पालक आणि शिक्षकांनीही त्याला प्रोत्साहन दिले. या परिस्थितीशी संघर्ष करताना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा निश्चय अनमोलने केला. अखेर त्याच्या या प्रयत्नांना कठीण संघर्षातही यश लाभले, असे अनमोलची आई अलका यांनी सांगितले.
ंआयआयटीत करणार भविष्य
कठीण संघर्षातही जिद्दीच्या भरवशावर अनमोलने यश मिळविले. त्याचप्रमाणे प्रबळ इच्छाशक्तीच्या भरवशावर कॅन्सरवरही मात करण्याची त्याची जिद्द आहे. यानंतर आयआयटीत करियर करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
अनमोलच्या इच्छाशक्तीला सलाम
अनमोलला ब्लड कॅन्सर असल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती, हिमोग्लोबीन कमी झाले. प्लेटलेटस् तयार होत नव्हते. पण या साऱ्या त्रासापलीकडे त्याची विजिगिषूवृत्ती मोठी होती. रुग्णालयात भरती असतानाही सुट्टी मागून त्याने सर्व पेपर दिले. केमोथेरपीचा उपचार आणि कॅन्सरचा प्रभाव मेंदूवर होऊ नये म्हणून आठवड्यात एकूण १२ इंजेक्शन त्याला पाठीत देण्यात येत होती. हा उपचार त्यावर अजून चार महिने चालणार आहे. पण त्याने हार मानली नाही म्हणूनच त्याला यशश्री खेचून आणता आली.
- डॉ. अवतारकृष्ण गंजू,
ब्लड कॅन्सर विशेषज्ञ

Web Title: 'Priceless' struggle for life-death - Fight against blood cancer:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.