साेयाबीनचे दर साडेतीन हजारावर; शेतकरी म्हणतात, पीक परवडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:28+5:302021-09-26T04:08:28+5:30
सुनील चरपे लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात साेयाबीनचा पेरा २,६३,६९४ हेक्टरने वाढला असला तरी, नागपूर ...

साेयाबीनचे दर साडेतीन हजारावर; शेतकरी म्हणतात, पीक परवडेना!
सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात साेयाबीनचा पेरा २,६३,६९४ हेक्टरने वाढला असला तरी, नागपूर जिल्ह्यात ९,६१७ हेक्टरने घटना आहे. कीड व राेगांचा वाढता प्रादुर्भाव तसेच ऑगस्टमध्ये पावसाची दडी व कापणीच्या वेळी येणारा परतीचा पाऊस यामुळे मागील पाच वर्षात साेयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे. या प्रकारामुळे साेयाबीनचे उत्पादन घटत चालले असून, वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने साेयाबीनचे पीक आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिले नाही, अशी प्रतिक्रिया साेयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली.
जून २०२१ मध्ये साेयाबीनचे कमाल दर प्रति क्विंटल १०,४०० रुपयांवर गेल्याने चालू खरीप हंगामात साेयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात हाेती. मात्र, मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता, जिल्ह्यातील साेयाबीन पेरणी क्षेत्र ९,६१७ हेक्टरने घटले. हल्ली देशात बियाणे कंपन्या व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले साेयाबीनचे बियाणे राेग व किडींना प्रतिबंधक राहिलेे नाही. त्यामुळे दरवर्षी साेयाबीनचे उत्पादन घटत चालले असून, खर्च मात्र वाढत आहे, अशी माहिती नरखेड येथील शेतकरी मदन कामडे यांच्यासह इतर साेयाबीन उत्पादकांनी दिली.
जगात राेग व कीड प्रतिबंधक तसेच कमी-अधिक पाऊस सहन करणारे साेयाबीनचे ‘जीएम’ वाण विकसित करण्यात आले आहे. या वाणाची प्रति एकर उत्पादकताही साध्या वाण्याच्या तुलनेत खूप अधिक आहे. केंद्र शासनाने मात्र ‘जीएम’ बियाणे वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. देशातील तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना कमी किमतीत खाद्यतेल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने भारतीय शेतकऱ्यांना ‘जीएम’ बियाणे वापरण्याची अधिकृत परवानगी द्यायला हवी, अशी प्रतिक्रिया मदन कामडे, संजय वानखेडे, रामचंद्र बहुरूपी यांच्यासह अन्य साेयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
...
सोयाबीनचे सरासरी दर (प्रति क्विंटल-रुपयात)
जानेवारी २०२० - ३,८००
जून २०२० - ३,३५०
ऑक्टोबर २०२० - ३,१५०
जानेवारी २०२१ - ४,२००
जून २०२१ - ६,५००
सप्टेंबर २०२१ - ४,१००
........
सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)
२०१८ - १,३३,२६७
२०१९ - १,३३,७८४
२०२० - १,०२,३८७
२०२१ - ९२,७७०
...