भिवापूर, कुहीत काँग्रेसचे नगराध्यक्ष

By Admin | Updated: November 28, 2015 03:28 IST2015-11-28T03:28:23+5:302015-11-28T03:28:23+5:30

जिल्ह्यातील तीन नगर पंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली.

President of Bhiwapur, Kuhit Congress | भिवापूर, कुहीत काँग्रेसचे नगराध्यक्ष

भिवापूर, कुहीत काँग्रेसचे नगराध्यक्ष

नागपूर : जिल्ह्यातील तीन नगर पंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसने दोन ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका नगर पंचायत अध्यक्षपदी आपल्या पक्षाच्या सदस्याची वर्णी लावली. दुसरीकडे शिवसेनेने ऐनवेळी काँग्रेसला ‘हात’ दिल्याने भाजपची कोंडी झाली. ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी ही मोठी धक्का मानला जात आहे.

भाजपला शिवसेनेचा ‘दे धक्का’

कुही, भिवापूर आणि हिंगणा नगर पंचायत निवडणुकीत ५१ पैकी सर्वाधिक १४ जागांवर भाजपने विजय मिळविलेला असला तरी कोणत्याच नगर पंचायतमध्ये बहुमत मिळविता आले नाही. कुहीत पाच, भिवापूरमध्ये तीन तर हिंगण्यात सहा जागा प्राप्त केल्या. कुहीत बहुमतासाठी काँग्रेसला एका सदस्याची आवश्यकता होती तर भिवापूरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या दोन नगर पंचायतमध्ये भाजपने जोर लावला असता तर सत्ता प्राप्त करता आली असती.
मात्र स्थानिक नेत्यांमध्ये असलेला दुरावा, मतभेद यामुळे ते करता आले नाही. त्यातल्या त्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपची साथ सोडून काँग्रेसला ‘हात’ दिला. भिवापुरात भाजप, शिवसेना आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता प्राप्त करता आली असती. मात्र त्यासाठी नेते उदासीन असल्याने काहीच होऊ शकले नाही. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आ. राजेंद्र मुळक यांनी यशस्वी खेळी खेळत कुही आणि भिवापूर नगर पंचायतचे अध्यक्षपद आपल्या पक्षाच्या सदस्याला मिळवून देण्यात यश मिळविले.

भिवापुरात काँग्रेस-शिवसेनेची युती
तीन नगर पंचायतींपैकी सर्वाधिक रंगतदार चित्र भिवापूर येथे निर्माण झाले होते. तेथे सर्वाधिक पाच जागांवर काँग्रेसने विजय मिळविला असला तरी बहुमतासाठी जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली. शिवसेनेचे चार, भाजप आणि बसपाचे प्रत्येकी तीन तर अपक्ष दोन याप्रमाणे तेथे उमेदवार निवडून आले. कोणत्याच पक्षाकडे बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. त्यात काँग्रेसकडून आ. राजेंद्र मुळक यांनी डावपेच आखून शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी होऊन ऐन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी केली. त्यामुळे काँग्रेसचे पाच आणि शिवसेनेचे चार असे एकूण नऊ संख्याबळ त्यांच्याकडे होऊन बहुमताचा आकडा पार करण्यात काँग्रेसला यश मिळाले. त्या बळावर भिवापुरात काँग्रेसने नगराध्यक्षपदी आपल्या पक्षाचा उमेदवार बसविला तर उपाध्यक्षपद हे शिवसेनेला देण्यात आले.

Web Title: President of Bhiwapur, Kuhit Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.