नासुप्र सभापतींचा अहवाल सादर
By Admin | Updated: November 11, 2015 02:33 IST2015-11-11T02:33:01+5:302015-11-11T02:33:01+5:30
सीताबर्डी येथे ८ एकर जागेवर भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे. कॉम्प्लेक्ससाठी जागा मागण्यात...

नासुप्र सभापतींचा अहवाल सादर
हायकोर्ट : सीताबर्डीतील कमर्शियल कॉम्प्लेक्सचे प्रकरण
नागपूर : सीताबर्डी येथे ८ एकर जागेवर भव्य कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात येत आहे. कॉम्प्लेक्ससाठी जागा मागण्यात आल्यामुळे अभ्यंकर रोडवरील १८ दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने प्रकरणावर दीर्घ सुनावणी घेतल्यानंतर दुकानदारांना नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींसमक्ष तक्रार मांडण्याची व तडजोडीने प्रश्न मिटविण्याची सूचना केली होती. त्यानुसार नासुप्र सभापतींनी न्यायालयात अहवाल सादर केला आहे. न्यायालयाने या अहवालाची प्रत सर्व पक्षकारांना देण्यास सांगितले असून, प्रकरणावर १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
संबंधित दुकानदारांना २४ एप्रिल २०१५ रोजी नागपूर सुधार प्रन्यास कायद्याच्या कलम ११५ अंतर्गत नोटीस बजावून कमर्शियल कॉम्प्लेक्सकरिता ८ मीटर जागा खाली करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जागा खाली न केल्यास स्वत: कारवाई करू, असे नासुप्रतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या नोटीसविरुद्ध दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तडजोड होईपर्यंत संरक्षण देण्यात यावे, वादग्रस्त नोटीस रद्द करण्यात यावी, कॉम्प्लेक्सचा आराखडा चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आला आहे, जमीन मालकाचे आक्षेप विचारात घेण्यात आलेले नाहीत, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. २००२ मध्ये बुटी परिवाराच्या जागेवरील भाडेकरूंसोबत झालेल्या तडजोडीनंतर कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या योजनेवर अंमलबजावणी सुरू झाली होती. शासनाने योजनेला मान्यता दिल्यानंतर जमीन संपादित करण्यात आली. गोयल गंगा इन्फ्रास्ट्रक्चर अॅन्ड रिअल इस्टेट कंपनीला कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)