अस्सल मराठी गीतांचे सादरीकरण
By Admin | Updated: January 23, 2015 02:48 IST2015-01-23T02:48:51+5:302015-01-23T02:48:51+5:30
आशा भोसले यांनी दीदींचे ज्ञानेश्वरीचे गीत ‘अवचिता परिमळु...’ आणि यशवंत देव यांचे ‘विसरशील खास मला..’ सुरेश भटांचे ‘मलमली तारुण्य माझे...’ सादर केले.

अस्सल मराठी गीतांचे सादरीकरण
नागपूर : आशा भोसले यांनी दीदींचे ज्ञानेश्वरीचे गीत ‘अवचिता परिमळु...’ आणि यशवंत देव यांचे ‘विसरशील खास मला..’ सुरेश भटांचे ‘मलमली तारुण्य माझे...’ सादर केले. त्यानंतर त्यांनी ठसक्यात लावणीला प्रारंभ केला. ‘येता जाता धक्का का हो मारता...रेशमाच्या रेघांनी.., हाय बुगडी माझी सांडली ग...’ सादर करून रसिकांची दाद घेतली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘गोमु संगतीने माझ्या तू येशील का...’ हे गीत त्यांच्या नातवासह चिंटू भोसलेसह सादर केले. निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या आग्रहाखातर त्यांनी हे गीत वेगवेगळे गायक कसे सादर करतील. याची नक्कल करुन दाखविली. यात त्यांनी नुरजहाँ, गुलाम अली, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ आणि दीदींच्या शैलीत गीत सादर केले. त्यांना हिंदी गीत सादर करण्याची विनंती करण्यात आली पण मी अस्सल मराठी असल्याचे सांगून हिंदी गीत सादर करणे टाळले.
खा. विजय दर्डा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन
आशा भोसले यांच्या कार्यक्रमापूर्वी नागपूर महोत्सवाचे उद्घाटन लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आ. जोगेन्द्र कवाडे, आ. सुधाकर देशमुख, आ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, मनपा स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नागपूर महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, संयोजक संदीप जोशी,विभागीय आयुक्त अनुपकुमार, नासुप्र सभापती श्याम वर्धने, मनपा आयुक्त श्रावण हार्डीकर, मनपा शिक्षण समिती सभापती चेतना टांक, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, सभापती रमेश सिंगारे, बसपा नेता किशोर गजभिये, मुन्ना यादव, अविनाश ठाकरे, बंडू राऊत, रश्मी तिवारी, प्रमोद भुसारी, प्रफुल्ल फरकसे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उद्घाटन खा. विजय दर्डा यांनी केले.
याप्रसंगी खा. विजय दर्डा यांनी महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली. हे वर्ष विदर्भासाठी महोत्सवाचेच वर्ष आहे. नागपूरचे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री झालेत आणि येथीलच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. त्या आनंदाचे सेलिब्रेशनच या महोत्सवाच्या माध्यमातून आपण करीत आहोत. पक्षीय मतभेद बाजूला सारून नितीनजी आणि फडणवीस हे राज्याचा आणि विदर्भाचा विकास करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे संचालन शुभांगी रायलु यांनी तर प्रास्ताविक सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार महापौर प्रवीण दटके यांनी मानले.
पत्रकारांची गैरसोय
यंदा पत्रकारांसाठी विशेष जागा राखून ठेवण्यात आली पण ती जागा वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी अयोग्य होती. मुख्य रंगमंचाच्या फार दूर मीडिया कक्ष ठेवण्यात आला. त्यामुळे रंगमंचावरचे अतिथी आणि गायक कलावंत यांचे चेहरे पत्रकारांना स्पष्ट दिसत नव्हते. याशिवाय स्टेजपासून पत्रकारांना दूर अंतरावर बसविण्यात आल्याने कार्यक्रमाचे वार्तांकन करताना अडचणी येत होत्या. कारण रंगमंचावरील प्रकाश पत्रकारांपर्यंत पोहोचत नसल्याने नोंदी लिहिणे कठीण झाले. हा महोत्सव लाखो लोकांपर्यंत माध्यमांच्या स्वरूपात पोहोचविणाऱ्या पत्रकारांची किमान सोय करायला हवी होती, असा सूर यावेळी होता. (प्रतिनिधी)
सुरेश भटांना ‘मिस’ करते : आशा भोसले
सुरेश भट म्हणजे श्रेष्ठ कवी होते. त्यांची कविता नेहमीच माझ्यासमोर उभी राहते. ते विलक्षण ताकदीचे कवी होते. त्यांनी लिहिलेली गीते आजही काळजात घर करून आहेत. अनेकदा विदेशात असताना डोंगर, वनराई पाहिली सुरेश भटांच्या कवितेनेच निसर्गाचे रूप घेतल्याचा भास होतो. त्यांच्या आठवणींनी मी नेहमीच व्याकुळ होते. नागपुरात येऊन त्यांच्याशी भेट झाली नाही, असे कधीच झाले नाही. त्यामुळेच त्यांनी मी खूप मिस करते, असे आशा भोसले म्हणाल्या.
आशातार्इंचा शतायुषी सत्कार येथेच करणार : गडकरी
याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, खा. विजय दर्डा, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आशातार्इंचा सत्कार नागपूरकरांच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले, आशातार्इंच्या वयाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचा नागपुरात पुन्हा सत्कार करू. याप्रसंगी आशातार्इंनीही खा. दर्डा आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांना प्रतिसाद देत दाद दिली.
नागपूरकर कलावंतांना संधी
आशातार्इंनी गायनाला प्रारंभ करण्यापूर्वी आशातार्इंच्या विनंतीवरून दोन नागपूरकर कलावंतांना संधी देण्यात आली. यात शहरातील गायिका भाग्यश्री बारस्कर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला...’ आणि सारंग जोशी यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे...’ हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. प्रारंभी काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य, बँडपथकाचे वादन आणि जिम्नॅॅस्टीकचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.