अपहरण झालेल्या तरुणीला हजर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:57+5:302021-06-16T04:10:57+5:30
नागपूर : अपहरण झालेल्या हिंगणा येथील १४ वर्षीय तरुणीचा येत्या ३० जूनपर्यंत शोध घेऊन तिला न्यायालयात हजर करा, असा ...

अपहरण झालेल्या तरुणीला हजर करा
नागपूर : अपहरण झालेल्या हिंगणा येथील १४ वर्षीय तरुणीचा येत्या ३० जूनपर्यंत शोध घेऊन तिला न्यायालयात हजर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पोलीस आयुक्तांना दिला. तसेच, या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे हस्तांतरित करण्यास सांगितले. मुलीचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली याची माहितीही पोलीस आयुक्तांना मागितली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वडील मुक्तेश्वर गव्हाळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुलीला तातडीने शोधून काढण्याची विनंती केली आहे. मुलगी ३ फेब्रुवारी २०२१ पासून बेपत्ता झाली आहे. गव्हाळे यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. विकास माखनलाल मावसकर या तरुणाने मुलीचे अपहरण केल्याचा गव्हाळे यांचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना तक्रार सादर केली आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सदर आदेश दिला.