उपराजधानीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 7, 2015 02:54 IST2015-06-07T02:54:18+5:302015-06-07T02:54:18+5:30
दिवसभर ढगांच्या लपाछपीचा खेळ सुरू होता. कडक ऊन आणि सावलीमुळे झालेल्या गर्मीने नागरिक त्रस्त झाले होते.

उपराजधानीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
नागपूर : दिवसभर ढगांच्या लपाछपीचा खेळ सुरू होता. कडक ऊन आणि सावलीमुळे झालेल्या गर्मीने नागरिक त्रस्त झाले होते. परंतु शनिवारी रात्री ९.३० च्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. ४५ मिनिटे जोरदार पाऊस पडला. त्यानंतर हलक्या पावसाच्या सरी सुरू होत्या. त्यामुळे हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे मानण्यात येत आहे.
चार दिवसांच्या विलंबानंतर केरळात दक्षिण-पश्चिम मान्सूनने शुक्रवारी हजेरी लावली. त्यासोबतच विदर्भात मान्सूनच्या पावसाची वाट पाहणे सुरू झाले. हवामान तज्ज्ञांच्या मते ४८ तासात मान्सून पुढे सरकत १० ते १५ जूनपर्यंत विदर्भात पोहोचण्याची चिन्ह दिसत आहेत. सध्या मान्सून अरबी सागर, लक्षद्वीप, केरळा, कर्नाटक, तामिळनाडुच्या काही भागात पोहोचला आहे. विदर्भात १० जूनला मान्सून पोहोचण्याची तारीख ठरविण्यात आली आहे. यावेळी केरळात मान्सून उशिरा पोहोचल्यामुळे नागपुरातही तो १५ ते २० जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मागील दहा वर्षात ६ ते २० जून दरम्यान मान्सूनचे आगमन झाले होते. आज ज्या पद्धतीने पावसाने हजेरी लावली, त्याकडे पाहून पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची आशा नागरिकांना आहे. शनिवारी सकाळी आकाशात ढग जमा झाले होते. मध्येच ऊन पडत होते. दुपारच्या वेळी गर्मीत वाढ झाली होती. कमाल तापमान ४२.४ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. परंतु रात्री पाऊस पडल्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले. (प्रतिनिधी)