अधिवेशनासाठी पोलीस सज्ज
By Admin | Updated: December 5, 2015 09:10 IST2015-12-05T09:10:19+5:302015-12-05T09:10:19+5:30
येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत.

अधिवेशनासाठी पोलीस सज्ज
तीन हजारावर पोलीस दाखल : फोर्स वन कमांडो’ पहिल्यांदाच तैनात
नागपूर : येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. यंदा पहिल्यांदाच मुंबई फोर्स वन कमांडोंना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. यंदा अधिवेशनाचा बंदोबस्त हायटेक राहणार आहे. सर्व पोलीस अधिकारी व्हॉट्सअॅप आणि इतर माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पोलीस विभागही कडेकोट बंदोबस्तासाठी सज्ज झाला आहे. शहर पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव यांनी बंदोबस्ताची कमान स्वत: सांभाळली आहे. ते स्वत: दररोज प्रत्येक ठिकाणी बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी भेट देतात. राज्यातील अन्य जिल्हा पोलीस दलातून कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात येत असतात. यावेळी मुंबई (शहर आणि ग्रामीण), ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर ग्रामीण, अकोला, नांदेड, नाशिक, वाशिम, यवतमाळ येथून पोलीस अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. यंदा दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, १५ पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, २९ सहायक पोलीस आयुक्त, ८५ पोलीस निरीक्षक, ३७० पोलीस उपनिरीक्षक, ३२०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या १४ प्लाटून, आठ कंपन्यांमधील जवान आणि १२०० होमगार्ड यांचा समावेश आहे. यासोबतच नागपुरातील वरिष्ठ अधिकारी शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईवरून विशेष पथक येणार आहे. यासोबतच रामगिरी, देवगिरी, विधानभवन, रविभवन आणि कार्यालयाच्या सुरक्षेसाठी गुप्त पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
निवास व्यवस्था
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था एमएसईबी गेस्ट हाऊस, सीआरपीएफ गेस्ट हाऊस व अमरावती मार्गावरील एनबीएसएस वसतिगृहात करण्यात आली आहे. २७ मंगल कार्यालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
विधानभवन, मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन, हैदराबाद हाऊस, आमदार निवास, शासकीय बंगले, तसेच मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट , संविधान चौक, एनआयटी चौक, आणि जयस्तंभ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. मोर्चेकरी, पोलीस सुरक्षा व्यवस्था आणि या रस्त्यांवरील हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. सीसीटीव्हीसाठी ८ पॉर्इंट बनविण्यात आले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी अस्थायी स्वरूपाचे एक पोलीस नियंत्रण कक्षही तयार करण्यात येत आहे.