आंबेडकर स्मारकाचा आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:53 IST2017-11-12T00:53:02+5:302017-11-12T00:53:13+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक धंतोली येथील पटवर्धन ग्राऊंड येथे व्हावे, यासाठी वाढीव जागेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

आंबेडकर स्मारकाचा आराखडा तयार करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक धंतोली येथील पटवर्धन ग्राऊंड येथे व्हावे, यासाठी वाढीव जागेच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या स्मारकासंदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची बैठक झाली. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, बहुजन समाज पक्षाचे गटनेते महम्मद जमाल, जितेंद्र घोडेस्वार, महेश नागपुरे तसेच नगरसेवक उपस्थित होते.
गेल्या महिन्यात महापालिका सभागृहात काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. बसपाच्या नगरसेवकांनी आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मुद्यावरून सभागृहात धुमाकूळ घातला होता. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी बसपाच्या नगरसेवकांना यासंदर्भात पुढील सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम चांगल्या पद्धतीने होईल. या स्मारकाच्या बांधकामासंदर्भातील आराखडा संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर तयार करावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या. स्मारकाबाबतच्या आजवरच्या फाईल्स मागविण्यात आल्या आहेत. तत्कालीन सरकारने यात त्रुटी ठेवल्या आहेत. त्या दूर करून सुधारित आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आर्किटेक्ट अशोक मोखा यांच्याकडे आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.