नागरिकांच्या समाधानासाठी प्रशासन सज्ज
By Admin | Updated: August 9, 2015 02:53 IST2015-08-09T02:53:24+5:302015-08-09T02:53:24+5:30
ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयात ९ आॅगस्टला होणाऱ्या समाधान शिबिराची संपूर्ण तयारी झाली ...

नागरिकांच्या समाधानासाठी प्रशासन सज्ज
आज समाधान शिबिर : महापौरांनी केली व्यवस्थेची पाहणी
नागपूर : ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयात ९ आॅगस्टला होणाऱ्या समाधान शिबिराची संपूर्ण तयारी झाली असून नागरिकांच्या समाधानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी या शिबिराच्या व्यवस्थेची महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात येईल. विशेष अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहरातील सर्व आमदार, नगरसेवक उपस्थित राहतील.
या समाधान शिबिराचा मुख्य समारंभ ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या सभागृहात होईल. या सभागृहात ज्या नागरिकांना कूपन दिले आहे त्यांना प्रवेश देण्यात येईल. नागरिकांना वेळेवर तक्रार अर्ज करावयाचे आहे. त्यांच्यासाठी वेगळे प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. विविध विभागाची दालने महाविद्यालय परिसरात उभारण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळी प्रवेशद्वारे ठेवण्यात आली आहेत.
विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार यांच्यासाठी सभागृहात छोटा मंच तयार करण्यात आला आहे. वृत्त संकलनासाठी येणाऱ्या वृत्त प्रतिनिधींकरिता हॉलमध्ये प्रेक्षक गॅलरीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे.
समाधान शिबिरात येणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग, नासुप्रने खबरदारी घेतली आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)