बिजापूर चकमकीनंतर गडचिरोली-गोंदियात ऑपरेशनची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:50+5:302021-04-05T04:07:50+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली-गोंदियात हायअलर्ट जारी करण्यात आला. सी-६०सह ...

Preparations for operation in Gadchiroli-Gondia after Bijapur encounter | बिजापूर चकमकीनंतर गडचिरोली-गोंदियात ऑपरेशनची तयारी

बिजापूर चकमकीनंतर गडचिरोली-गोंदियात ऑपरेशनची तयारी

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली-गोंदियात हायअलर्ट जारी करण्यात आला. सी-६०सह सुरक्षा दलाच्या विविध पार्ट्यांनी जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केेले आहे. बिजापूरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर तिकडच्या अनेक नक्षल्यांची धरपकड तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेस्ट झोनकडे (गडचिरोली-गोंदिया) पलायन केल्याचे वृत्त आल्याने इकडच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत.

यावर्षीच्या सुरुवातीपासूनच गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांनी नक्षल्यांची नांगी ठेचण्याची मोहीम तीव्र केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध जंगलात गेल्या तीन महिन्यात नक्षल्यांसोबत पोलिसांच्या सात चकमकी झाल्या आहेत. यात पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्थान घातले असून, ५ जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे, तर, चार नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या चकमकीदरम्यान पोलिसांनी नक्षल्यांकडून मोठा दारूगोळा, शस्त्र आणि त्यांचे साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. त्यामुळे बॅकफूटवर गेलेले नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

दरवर्षी मार्च ते मे हा कालावधी नक्षल्यांचा आक्रमक पिरिएड मानला जातो. दरवर्षी ते या कालावधीत मोठे घातपात करण्याच्या तयारीत असतात. त्यानुषंगाने सुरक्षा यंत्रणांकडूनही टीसीओसी (टॅक्टिकल काउण्टर अफेन्सिव कॅम्पेन)ची जोरदार तयारी केली जाते. विशेष म्हणजे, देशातील सर्वच भागात या कालावधीत नक्षली घात लावून बसले असतात, याची माहिती असूनही बिजापूरमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली अन् देशाला २२ जवान गमवावे लागले. छत्तीसगडमध्ये असा मोठा घातपात केल्यानंतर नक्षलवादी गडचिरोली-गोंदियाच्या जंगलात पळून येतात. शनिवारच्या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात छत्तीसगड सीमेला लागलेल्या जंगलात नक्षली आल्याची गुप्तसूचना मिळाल्यामुळे पोलिसांनी या सीमेवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. मोठी कोणतीही घटना घडल्यास नक्षल्यांना नामोहरम करण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचे शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे. तसे आम्ही वर्षभर अलर्टच असतो. मात्र, शनिवारच्या बिजापूरच्या घटनेनंतर अधिक सतर्कता बाळगण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, सुरक्षा दलाच्या विविध तुकड्या रात्रंदिवस सक्रिय करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

---

तीन महिन्यातील गडचिरोलीतील चकमकी

२ जानेवारी - माैजा फुलकोंडा जंगल ५ नक्षल्यांना अटक - मोठे नक्षल साहित्य जप्त

३ मार्च - माैजा हिरेकर जंगल १ अधिकारी, २ पोलीस जखमी

४ मार्च आणि ५ मार्च - कोपर्शी जंगलात चकमक - ३ पोलीस जखमी

२३ मार्च - गुडंजूर जंगल - चकमक - नक्षल साहित्य जप्त

२७ मार्च - खोब्रामेंढा जंगल - चकमक - नक्षल साहित्य जप्त

२९ मार्च - खोब्रामेंढा जंगल - ५ नक्षली ठार - २ कर्मचारी जखमी

---

है तय्यार हम : डीआयजी पाटील

नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शनिवारी बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आला असून, कोणत्याही स्थितीला निपटून काढण्याची आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया या संबंधाने गडचिरोली गोंदियाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी लोकमतला दिली.

----

Web Title: Preparations for operation in Gadchiroli-Gondia after Bijapur encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.