हैवानी याकूबच्या मनाची फाशीसाठी तयारी
By Admin | Updated: July 23, 2015 02:53 IST2015-07-23T02:53:04+5:302015-07-23T02:53:04+5:30
२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता.

हैवानी याकूबच्या मनाची फाशीसाठी तयारी
मौत कब आएगी? : पश्चात्ताप नाही, अस्वस्थता मात्र कायम
लोकमत विशेष
योगेश पांडे नागपूर
२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. ‘मौत कब आएगी और कितनी दर्दनाक होगी?’ हा प्रश्न तो सातत्याने विचारत होता. नंतर मात्र आपल्या दुष्कृत्याचे समर्थन करणारी मानसिकता तो बनवत गेला. सध्याच्या घडीला याकूब शांत असून फाशीवर चढायला काही दिवस शिल्लक राहिले असतानादेखील त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही.
२२ वर्षांअगोदर झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी करण्यात आलेल्या ‘ब्रेनवॉशिंग’चे परिणाम अद्यापही कायम असून त्याला पश्चाताप झाला ही बाब कपोलकल्पित आहे. याकूबने हे हैवानी कृत्य रागाच्या भरात किंवा विकृत मानसिकतेतून केले नव्हते. होणाऱ्या परिणामांची त्याला जाणीव होती असे त्याच्यावर अनेक वर्षे मानसिक उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले आहे.
२००७ साली नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. परंतु मुंबईच्या ‘आॅर्थर रोड’ तुरुंगात असतानापासूनच त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते. त्यानंतर त्याच्यावर जे.जे.इस्पितळात उपचारदेखील झाले होते. नागपुरात आल्यानंतर त्याला मानसिक आजाराचा फारसा त्रास झाला नाही. परंतु तुरुंगातील मानसोपचार तज्ज्ञ नियमितपणे त्याची भेट घ्यायचे. तुरुंगात एरवी शांत व फारसा कोणाशी न बोलणारा याकूब मानसोपचार तज्ज्ञांजवळ आपले मन मोकळे करायचा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर तो संतापला होता. माझे मरण नेमके कधी येईल व शिक्षा कुठे होईल याबाबतीत विचारणा करायचा. परंतु नंतर तो स्वत:च मरणाची काय भीती बाळगायची, ‘जो किया वह सोच कर ही किया’ असे म्हणायला लागला.
आतादेखील याकूबला मोठा मानसिक आजार नाही. एक काळ होता की त्याच्याकडे इतर सहकाऱ्यांना भाषा शिकविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता तो अंडा सेलमध्ये असून त्याला इतर कैद्यांशी भेटू दिले जात नाही. ‘आॅर्थर रोड’ जेलमधील सुरुवातीच्या दिवसांमध्येदेखील अशीच स्थिती होती. त्यामुळे त्याला एकटेपणामुळे मानसिक नैराश्य आले आहे. परंतु त्याला केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाही. मरणाला तो तयार आहे असे संबंधित मानसोपचार तज्ज्ञांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
रात्री झोप येण्यासाठी गोळ््या
याकूब मेमनला मुंबईपासूनच रात्री झोप न येण्याचा त्रास आहे. एकटेपणातून आलेल्या मानसिक नैराश्यामुळे त्याला रात्री झोप लागायची नाही. अनेकदा तर झोपेच्या गोळ््या घेणे भाग पडले. आजही या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही.
पश्चाताप नव्हे, दिसतो तो संताप
गुन्हेगाराला फाशीवर नेत असताना त्याला पश्चाताप होतो व तो विनवण्या करतो असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास केला असता यात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. अनेकदा फाशीच्या वेळी उपस्थित असणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनुसार, फाशीच्या वेळी संबंधित गुन्हेगाराच्या मनात पश्चाताप नव्हे तर भीती असते. या भीतीमधून निघणारा संताप व्यवस्थेवर व उपस्थित व्यक्तींवर निघतो. आकांडतांडव करणे, पाय झाडणे, शिव्या देणे असे प्रकार त्यांच्याकडून करण्यात येतात. वरून शांत वाटणारे गुन्हेगारदेखील अशाच पद्धतीने प्रतिक्रिया देतात असे मत गुन्हेगारी मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ.विजय शिंगणापुरे यांनी दिले.