कोरोनाच्या तिसऱ्या व चौथ्या लाटेसाठीदेखील तयारी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:43+5:302021-04-30T04:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्व सामना करत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी ...

कोरोनाच्या तिसऱ्या व चौथ्या लाटेसाठीदेखील तयारी हवी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाचे संकट मोठे असून त्याचा सर्व सामना करत आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी होत असली म्हणून निश्चिंत होणे योग्य होणार नाही. पुढे काय होईल याबाबत सांगितले जाऊ शकत नाही. तिसरी व चौथी लाटदेखील येऊ शकते व त्यासाठी आपण तयार असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्पाईस हेल्थच्या फिरत्या आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे गुरुवारी लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्पाईस हेल्थचे संचालक अजय सिंग हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर शहरातील कोरोनाबाधितांसाठी २०० व्हेंटिलेटर्स आले आहेत. शिवाय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता लवकरच हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरदेखील येणार असून, या सर्वांचे वितरण विदर्भातील ग्रामीण भागात होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून चाचणी अहवाल मिळण्याचा कालावधी १२ तास करण्याचासुद्धा प्रयत्न आहे. संबंधित अहवाल मोबाईलवरच मिळणार असल्याने प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. नागपूर शहरासोबतच पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नमुन्यांची चाचणीसुद्धा येथील प्रयोगशाळेत होणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
सीएसआरमधून मेयो, मेडिकलला १५ कोटी रुपये
गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्यासोबत गडकरी यांनी आढावा बैठक घेतली. सीएसआरअंतर्गत वेकोलितर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयोला १५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. सोबतच इतर पाच रुग्णालयांनादेखील सीएसआरमधून हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याच्या प्रकल्पासाठी निधी देण्यात येईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.