दहावी-बारावीच्या परीक्षांची युद्धस्तरावर तयारी
By Admin | Updated: February 7, 2015 02:13 IST2015-02-07T02:13:34+5:302015-02-07T02:13:34+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विभागीय शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांची युद्धस्तरावर तयारी
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विभागीय शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. बारावीच्या लेखी परीक्षेला २१ फेब्रुवारी तर दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी व परीक्षा केंद्र या दोघांचीही संख्या घटली आहे. प्रश्नपत्रिकांचे संच मंडळाच्या कार्यालयात येणे सुरू झाले आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदादेखील ‘कॉपीमुक्त’ अभियानावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विभागातून यंदा एकूण १ लाख ५६ हजार ८२० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३६८ इतकी आहे आहे. मागील वर्षीपेक्षा बारावीच्या ७ हजार ७०२ तर दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ६४८ ने घटली आहे.
परीक्षांसाठी तयारीवर जोर देण्यात येत असून बारावीची ओळखपत्रे कनिष्ठ महाविद्यालयांत पाठविण्यात आली आहेत. दहावीची ओळखपत्रेदेखील लवकरच येणे अपेक्षित आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिकेचे संच मंडळाच्या कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. मंडळाच्या वतीने केंद्रप्रमुख आणि परीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली असून येत्या १० तारखेपासून त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)