बहरला प्रेमाचा वसंत!
By Admin | Updated: February 15, 2016 02:55 IST2016-02-15T02:55:37+5:302016-02-15T02:55:37+5:30
खुल्लमखुल्ला प्रेम करण्यावर काही संघटनांनी लावलेली एकतर्फी सेन्सॉरशीप, कडेकोट बंदोबस्त आणि भिरभिरत्या ‘शोधक’ नजरा, अशा वातावरणात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचे तरुणाईसमोर आव्हान होते .

बहरला प्रेमाचा वसंत!
उपराजधानीत कडक पोलीस बंदोबस्त : सामाजिक उपक्रमांचा ‘व्हॅलेंटाईन डे’
नागपूर : खुल्लमखुल्ला प्रेम करण्यावर काही संघटनांनी लावलेली एकतर्फी सेन्सॉरशीप, कडेकोट बंदोबस्त आणि भिरभिरत्या ‘शोधक’ नजरा, अशा वातावरणात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचे तरुणाईसमोर आव्हान होते . पण ‘प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या प्रेमवीरांनी आपल्या हक्काचा दिवस साजरा केलाच. फक्त फरक हा होता की भेटण्याची जागा बदलली होती, प्रेम व्यक्त करण्यात नियंत्रितपणा होता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जबाबदारीचे भान राखत तरुणाईने प्रेमाचा वसंत फुलविला.
प्रेमाच्या बाबतीत ‘हुश्शार’ झालेल्या ‘यंगिस्तान’ने रविवारी भेटण्याचे कट्टेच बदलवले. कोणी शॉपिंग मॉलकडे मोर्चा वळविला तर कोणी आवडत्या रेस्टॉरेन्टकडे धाव घेतली. अनेकांनी नाहक मनस्ताप टाळण्यासाठी मोबाईल, फेसबुक व स्काईपचा आधार घेतला. अनेकजण तर अशा प्रकारे भेटले की इतरांना ते अनोळखीच वाटावे, पण नजरांतूनच प्रेमाची देवाणघेवाण झाली. केवळ प्रेमीयुगुलच नव्हे तर तरुणांच्या ग्रुप्सनेदेखील धमाल केली. कोणी ट्रॅफिक पार्कजवळ बसून निवांत चर्चा केली, तर कुणी बजाजनगरजवळ आपला कट्टा उभारला.
यंदा गालबोट नाही
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता शहरातील उद्याने ओस पडली होती. बजरंग दलाने काल इशारा रॅली काढली होती. दुसरीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेमी युगुलांना संरक्षण पुरविण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नसती भानगड कशाला असा विचार करून तरुणाईने सार्वजनिक स्थळांवर जाऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा बेत रद्द केला. सायंकाळच्या सुमारास शहरातील तरुणाईच्या कट्ट्यांवर गर्दी व्हायला सुरुवात झाली.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
मागील वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला झालेल्या गोंधळामुळे तणावाचे वातावरण होते. यंदा अशाप्रकारे कुठलीही घटना होऊ नये याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली होती. फुटाळा, महाराजबाग, ट्रॅफीक पार्क, सेमिनरी हिल्स या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. फुटाळ््यात दिवसभर ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले होते. तसेच ठराविक अंतरावर पोलीस दिसून येत होते.
फुटाळ्यावर २११ तरुणांचे रक्तदान
फुटाळा तलावावर फक्त तरुणाईची सामाजिक संवेदना पाहायला मिळाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. शिबिरात २११ तरुणांनी रक्तदान केले. सकाळपासून सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते व तरुणांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. यासोबतच फुटाळ्यावर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. काही शाळकरी मुलांनी दुपारच्या सुमारास पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
बदललेले कट्टे
दररोज रस्त्याच्या दुतर्फा आपले वाहन उभे करून गप्पा मारणाऱ्या तरुणाईने आज आपले कट्टे बदलवले होते. एरवी सेमिनरी हिल्स, महिला क्लब, अमरावती मार्ग या परिसरातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे प्रेमीयुगुल व तरुणांचे ग्रुप सिव्हिल लाईन्स, लक्ष्मीनगर, सुरेंद्रनगर, वर्धा रोड, आरपीटीएस, आयटी पार्क, शिवाजीनगर येथील शांत रस्त्यावर दिसून येत होती.
बजरंग दलाने लावले गाढवांचे लग्न
‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करण्याचा पवित्रा घेतलेल्या बजरंग दलातर्फे प्रेमीयुगुलांविरोधात आक्रमक प्रदर्शन करण्यात आले नाही. परंतु सकाळच्या सुमारास महाल येथील बडकस चौक परिसरात काही कार्यकर्त्यांनी गाढवांचे लग्न लावून ‘व्हॅलेंटाईन डे’चा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या विरोधात घोषणा दिल्या व ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याचे आवाहन केले. शिवाय परिसरात या गाढवांची मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी इशारा रॅली काढली होती.
शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करून साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त साधून नीलिमा हारोडे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले. प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकूडकर यांच्या ‘जहर खाऊ नका’ या अभियानाला साहाय्य करीत त्यांनी मौदा तालुक्यातील धानला गावातील तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रकमेची मदत केली. (अधिक वृत्त/२)