विवाहपूर्व थॅलेसिमियाची चाचणी आवश्यक

By Admin | Updated: May 8, 2014 12:52 IST2014-05-08T02:35:46+5:302014-05-08T12:52:50+5:30

दोन 'थॅलेसिमिया मायनर' पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारी अपत्ये अत्यंत घातक थॅलेसिमिया पीडित होऊ शकतात.

Pre-pre-Thalassemia testing is necessary | विवाहपूर्व थॅलेसिमियाची चाचणी आवश्यक

विवाहपूर्व थॅलेसिमियाची चाचणी आवश्यक

'एचपीएलसी' उपकरणाची मदत व्हावी
नागपूर : दोन 'थॅलेसिमिया मायनर' पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारी अपत्ये अत्यंत घातक थॅलेसिमिया पीडित होऊ शकतात. ज्यामुळे जीवहानी होण्याची भीती असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना थॅलेसिमिया मायनरची रक्त चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाच्यावतीने करण्यात आले आहे.
८ मे हा दिवस जागतिक थॅलेसिमिया दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले, थॅलेसिमिया हा एक रक्तजन्य अनुवांशिक रोग आहे. आईवडिलाद्वारे या रोगाचे संक्रमण अपत्यात होते. थॅलेसिमिया रोग काही समाजात थोड्या प्रमाणात आढळून येतो, परंतु सिंधी, पंजाबी, गुजराती, बंगाली, पारसी तसेच मुस्लिम समुदायात याचे प्रमाण जास्त आहे. 'थॅलेसिमिया मेजर' या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्तपुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार खूप कठीण आणि खर्चिक आहे. महाराष्ट्रात या आजाराचा उपचार मोफत व्हावा यासाठी थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाने मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्याशी मागील पाच वर्षापासून पाठपुरावा केल्याने शासकीय रुग्णालयात मोफत औषधे देणे सुरू झाले आहे.
या रोगाचे संक्रमण थांबविण्यासाठी विवाहपूर्व थॅलेसिमिया मायनरची रक्त चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्थेमार्फत आतापर्यंत ३0 हजार युवक-युवतींच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

थॅलेसिमिया मायनर रोगाची तपासणी 'एचपीएलसी' या उपकरणाद्वारे करण्यात येते. हे उपकरण शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. परंतु याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडिया या संस्थेला या उपकरणाची मदत झाल्यास याचा फायदा रुग्णांना होऊन वेळीच उपचारास मदत होईल.
-डॉ. विंकी रुघवानी
अध्यक्ष, थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडिया

Web Title: Pre-pre-Thalassemia testing is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.