प्रवीण दवणेंचे नागपुरात ‘सर्जिकल स्ट्राइक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 03:23 IST2016-10-14T03:23:16+5:302016-10-14T03:23:16+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे

प्रवीण दवणेंचे नागपुरात ‘सर्जिकल स्ट्राइक’
मिशन इलेक्शन : तीन दिवसीय मुक्कामात साहित्यिकांशी भेटीगाठी
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे असे प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’ स्टाईलने नागपुरात डेरेदाखल झाले असून या तीन दिवसीय मुक्कामात ते साहित्यिकांशी भेटीघाटी घेत निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. बुधवारी नागपुरात पोहोचलेल्या दवणे यांनी महामंडळाकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. आज गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. हा माझा प्रचार दौरा नाही. पण, नागपुरात आलोच आहे तर भेटीगाठी या होणारच आणि भेट झाली तर निवडणुकीच्या चर्चेशिवाय ती कशी पूर्ण होईल, असा प्रतिप्रश्न आपल्या खास शैलीत उपस्थित करून त्यांनी नागपूर भेटीचे ‘प्रयोजन’ सांगितले. मी ही निवडणूक लौकिकासाठी लढत नाहीये. भाषा, संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या डोक्यात आदर्श संमेलनाची जी कल्पना आहे ती वास्तवात उतरावी, हे संमेलन संवेदनेचा, समन्वयाचा उत्सव व्हावा, तरुणाईच्या मनात वाङ्मयीन उमेद जागवता यावी, हा माझा प्रयत्न आहे. मी उद्या जर संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून आलो तर या संमेलनाचा चेहरा तरुण होणार हे नक्की आहे. मला व एकूणच साहित्य विश्वाला हेच हवे आहे, याकडेही दवणे यांनी विशेष लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
पहिला आणि अखेरचा प्रयत्न
मी मनाच्या सुप्त तारांना अलवार शब्दांनी झंकारणारा कवी आहे. निवडणूक, राजकारण हा माझा पिंड नाही. साहित्य क्षेत्रातील माझ्या थोड्या-अधिक योगदानाच्या बळावर मी मराठी साहित्य संमेलनाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात यश मिळते की अपयश याची मला पर्वा नाही. हा माझा पहिला नि शेवटचा प्रयत्न आहे. निवडून आलो तर अध्यक्ष म्हणून माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या वास्तवात उतरविण्यासाठी प्रयत्न करेल आणि यश नाहीच मिळाले तर पुन्हा लिखाणाच्या कामात स्वत:ला गुंंतवून घेईल. तिकडेही खूप काम करायचे अजून बाकी आहे.
डॉ. काळेंचे काम मोठेच
या निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी असले तरी डॉ. अक्षयकुमार काळे यांचे समीक्षेच्या क्षेत्रातील काम मोठेच आहे. ते नागपूर-विदर्भाचे असल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याप्रती विशेष आस्था असणे स्वाभाविक आहे. परंतु मी भौगोलिक सीमा मानत नाही. मराठी साहित्याच्या जागर करीत मी देशभर फिरत असतो. त्यामुळे नागपूर-विदर्भातही माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेतच. त्यांची साथ मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.