दीपोत्सवातील ‘प्रकाशदूत’
By Admin | Updated: November 11, 2015 02:13 IST2015-11-11T02:11:36+5:302015-11-11T02:13:11+5:30
समाजातील वंचितांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण निमित्त व्हावं व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यामधून पराकोटीचा आनंद व आत्मिक समाधान मिळते.

दीपोत्सवातील ‘प्रकाशदूत’
नागपूर : समाजातील वंचितांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आपण निमित्त व्हावं व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यामधून पराकोटीचा आनंद व आत्मिक समाधान मिळते. दिवाळीचा सण हा प्रकाशाची उधळण करण्याचा सण आहे. त्यामुळे आपणही समाजाचे काहीतरी देणे लोगतो याच भावनेतून नागपुरातील नागरिकांनी वंचितांच्या आयुष्यात सकारात्मकतेची उधळण करण्याचा संकल्प केला आहे. ‘कंधो से मिलते हे कंधे’ या ओळींप्रमाणे एकत्र येत विविध वयोगटातील नागरिक वंचितांपर्यंत दीपोत्सव पोहोचविण्यासाठी तळमळ दाखवत आहेत. खऱ्या अर्थाने सकारात्मक विचारसरणीच्या या प्रकाशदूतांमुळे वंचितांच्या अंधारलेल्या आयुष्यात आनंदाची सुखद झुळुक येत आहे.
नागपूर : असे म्हणतात की, देव एका हाताने नेत असतो तर दुसऱ्या हाताने देतही असतो. प्लॅटफॉर्म निवासी शाळा येथील अनाथांच्या शाळेत राहणारी अनाथ मुले याच आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेत आहेत. काही असामाजिक तत्त्वांच्या दुष्कृत्यामुळे किंवा एका अनवधानाने प्रसंगी आईवडिंलाची साथ सुटली आणि घरातील मायेला ही मुले पोरकी झाली. मात्र दुसऱ्या दैवी क्षणी कुणाचा तरी आधार मिळाला आणि अनाथ झालेली ही मुले या शाळेत पोहचली. घरची माया हरपली मात्र माणुसकीची जाण असलेल्या परक्या माणसांची माया या मुलांना लाभत आहे. अगदी दिवाळीसारख्या क्षणीही ही माया या मुलांवर ओसंडून वाहत आहे. कुणी दिवाळीचा फराळ आणत आहेत तर कुणी फटाके आणि कुणी कपडे घेऊन देत आहेत. त्यामुळे येथील मुलांना दिवाळी ही अगदी घरीच साजरी होत असल्याचा अनुभव येतो हे विशेष.
विश्व हिंदू जनकल्याण परिषद आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बजेरिया येथील लाल शाळेत प्लॅटफॉर्म ज्ञान मंदिर निवासी शाळा मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. श्रीकांत आगलावे हे या शाळेचे प्रकल्प प्रमुख आहेत. आजच्या घडीला या शाळेत एकूण ४५ मुले आहेत. पहिल्या वर्गापासून तर इंजिनियरिंगपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा यात समावेश आहे. येथील प्रत्येक मुलाची एक स्वतंत्र आणि भावस्पर्शी कहाणी आहे. सुरुवातीला प्रत्येक मुलगा नाईलाजास्तव येथे आला परंतु येथील वातावरणात राहून तो इथलाच झाला, असे आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते येथील लोकांनी या मुलांसोबत जपले आहेत. येथे केवळ शिक्षणच नव्हे तर त्यांच्या संस्काराकडे विशेष लक्ष दिले जाते, हे विशेष. या मुलांकडे पाहून वाटणारच नाही की, एखाद्या अनाथालयातील मुले दिवाळी साजरी करीत आहे. येथे आल्यावर असे वाटते की येथील मुले आपल्या घरीच दिवाळी साजरी करताहेत. फराळांपासून तर कपड्यांपर्यंत सर्व काही समाजातील काही दानशूर मंडळींकडून आलेली भेट असली तर ती अतिशय जिव्हाळ्याने सर्व मुलांमध्ये समान वितरित केली जाते. दिवाळीसाठी खास पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्याला उटणे लावले जाते. त्यानंतर फराळ दिला जातो. भाऊबीज, लक्ष्मीपूजन आदी सर्व सामूहिकरीत्या साजरे केले जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाल शाळेतील ही प्लॅटफॉर्म निवासी शाळा अनाथालय नसून एक खऱ्या अर्थाने संस्कार करणारे ज्ञान मंदिर बनले आहे.
येथील मुलांना आपण एखाद्या अनाथालायत राहत असल्याचे अजिबात वाटत नाही, कारण येथील वातावरणच तसे आहे. ही शाळा त्यांच्यासाठी घर असून येथील प्रकल्पप्रमुख श्रीकांत आगलावे हे त्यांच्यासाठी वडील आहेत. खुद्द येथील मुलांनीच ही गोष्ट विशद केली. लाल मेईम मसीम याने बोलताना सांगितले की, तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौचा राहणारा आहे. बांगड्या तयार करणाऱ्या कारखान्यात तो काम करायचा. आईवडील नाहीत. मालक त्याला रोज मारहाण करायचा. त्यामुळे तो पळाला.
रेल्वेने नागपुरात आला. रेल्वे पोलिसांनी त्याला या शाळेत आणले. येथे आल्यावर त्याचे व्यक्तिमत्त्वच बदलून गेले आहे. सध्या तो सातव्या वर्गात शिकत असून मोठे होऊन शास्त्रज्ञ होण्याचे त्याचे स्वप्न आहे. उत्तर प्रदेशात माझ्यासारखी अनेक मुले आहेत. त्यांना अशाच शाळेची गरज आहे, मोठा होऊन मी या शाळेलाच मदत करेल, असे विश्वासाने तो सांगतो. हीच भावना येथील गुलफाम शेख, शरद गाडे, पीयूष बावने, सदरे आलम शेख आदींसह सर्वच मुलांची आहे.(प्रतिनिधी)