पोक्सोत आरोपीला दहा वर्षे कारावास
By Admin | Updated: January 6, 2017 02:16 IST2017-01-06T02:16:04+5:302017-01-06T02:16:04+5:30
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध होऊन लैंगिक अपराधापासून

पोक्सोत आरोपीला दहा वर्षे कारावास
विशेष न्यायालय : शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरण
नागपूर : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध होऊन लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याचे (पोक्सो) विशेष न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
राहुल रामू जनबंधू (२२), असे आरोपीचे नाव असून तो पिपळा डाक बंगला येथील रहिवासी आहे.
अत्याचाराची ही दुर्दैवी घटना ६ मे २०१५ रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली होती. घटनेच्या दिवशी रविवार असल्याने शाळेला सुटी होती. त्यामुळे पीडित मुलगी ही घरच्या बकऱ्या घेऊन जंगलात चारण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिला जंगलात एकटी पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता.घटनेबद्दल कुणाला सांगितल्यास त्याने जीवे मारण्याची धमकीही पीडित मुलीला दिली होती. ती घरी परतताच तिने घडलेली घटना आपल्या वडिलांना सांगितली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी खापरखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या दिवशी ७ मे २०१५ रोजी सकाळी ५.४० वाजता भादंविच्या ३७६ (१)(२) आणि लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी दुपारी १ वाजताच्या सुमारास आरोपी राहुल जनबंधू याला पोलिसांनी अटक केली होती. महिला पोलीस उपनिरीक्षक भारती कोठे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सहा आणि बचाव पक्षाच्या वतीने एक साक्षीदार तपासण्यात आला. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३७६ (२)(१) कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास, २ हजार रुपये दंड, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ६ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील आसावरी पळसोदकर यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, सहायक फौजदार अरुण भुरे, सलीम शेख, दिलीप कडू आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)