वीज कामगारांचे काम बंद आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:16+5:302021-05-24T04:08:16+5:30
जलालखेडा : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमध्ये कार्यरत सर्व नियमित अभियंते, कर्मचारी, तांत्रिक कामगार, कंत्राटी कामगार व सुरक्षारक्षकांना फ्रंटलाईन वर्करचा ...

वीज कामगारांचे काम बंद आंदाेलन
जलालखेडा : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीमध्ये कार्यरत सर्व नियमित अभियंते, कर्मचारी, तांत्रिक कामगार, कंत्राटी कामगार व सुरक्षारक्षकांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा यांसह अन्य मागण्या पूर्ण करण्याची संयुक्त वीज कृती समितीने आग्रही भूमिका घेतली आहे. शासनाने या मागण्या पूर्ण न केल्यास आज, साेमवारपासून काम बंद आंदाेलन करण्याचा इशाराही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
काेराेना संक्रमण व लाॅकडाऊनच्या काळात वीज कर्मचारी सतत कामावर आहे. त्यामुळे राज्याचा वीजपुरवठा अखंडित सुरू आहे. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांना व नंतर त्यांच्या कुटुंबीयांना काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शासनाने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आजवर काेणत्याही प्रभावी उपाययाेजना केल्या नाही. या संदर्भात आपण राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना १३ मे राेजी माहिती दिली आहे. मात्र, शासनाने आजवर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे काम बंद आंदाेलनाचा निर्णय घेण्यात आल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
परिणामी, वीज कर्मचारी व कामगारांना फ्रंटलाईन वर्कर घाेषित करून त्यांचे तातडीने काेराेना प्रतिबंधक लसीकरण करावे. इतर फ्रंटलाईन वर्करच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळत असून, यात वीज कामगारांना वगळण्यात आले आहे. ६० टक्क्यांपेक्षा अधिक वीज कामगार आजही काेराेना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित आहेत. कामगारांच्या मेडिक्लेममध्ये अचानक बदल करण्यात आल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक गावात काेराेना संक्रमण असताना वीज कामगारांवर वीज बिल वसुलीची सक्ती केली जात आहे. ही वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणीही तांत्रिक अप्रेंटिस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत ननोरे यांनी केली असून, या आंदाेलनात तांत्रिक अप्रेंटिस कामगार पूर्णपणे सहभागी हाेणार असल्याची माहिती विक्की कावळे यांनी दिली.
....
४०० कामगारांचा मृत्यू
काेराेनाच्या संक्रमणकाळात काेराेनाची लागण झाल्याने ४०० पेक्षा अधिक वीज कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त वीज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मृतांच्या वारसांना ५० लाख रुपयांच्या सानुग्रह विम्याचा लाभ देण्यात यावा. कामगार आर्थिक साहाय्य ३० टक्के योगदानातून सुरू असलेल्या मेडिक्लेम निर्णयात बदल करताना संघटनांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचा आराेप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.