अमित समर्थचा पराक्रम
By Admin | Updated: October 7, 2016 03:13 IST2016-10-07T03:13:22+5:302016-10-07T03:13:22+5:30
जगातील सर्वात प्रतिष्ठेची आणि खडतर मानल्या जाणारी सायकल शर्यत ‘रेस अक्रॉस अमेरिका’ यासाठी तयारी करीत असलेला नागपूरचा सायकलपटू डॉ. अमित समर्थने

अमित समर्थचा पराक्रम
‘रेस अक्रॉस अमेरिका’ची
तयारी : सायकलने केला
२७०० किलोमीटरचा प्रवास
नागपूर : जगातील सर्वात प्रतिष्ठेची आणि खडतर मानल्या जाणारी सायकल शर्यत ‘रेस अक्रॉस अमेरिका’ यासाठी तयारी करीत असलेला नागपूरचा सायकलपटू डॉ. अमित समर्थने मंगळवारी नागपूर-हैदराबाद-बेंगळुरु-नागपूर असा २७०० किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करण्याचा पराक्रम केला.
अनेक अडचणींवर मात
डॉ. अमित समर्थ यांनी या मॅराथॉन सायकल प्रवास मोहिमेची सुरुवात ३० सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता आरबीआय चौकातून केली. हैदराबादकडे कूच करताना त्यांनी १५ किलोमीटर पार केले असताना त्यांची पावसासोबत गाठ पडली. या प्रवासात पुढेही या अडचणीला सामोरे जावे लागले. बेंगळुरुकडे जाताना त्यांना जवजवळ दोन तास विश्रांती घ्यावी लागली. १ आॅक्टोबरला पहाटे ५ वाजता त्यांना बोचऱ्या थंडीचे आव्हान पेलावे लागले. त्यानंतरचे ८० किलोमीटर अंतर त्यांना वादळी वारा व जोरदार पावसामध्ये पूर्ण करावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती हुबळीमध्ये पोहोचताना होती. पुढच्या टप्प्यात पुण्याकडे रवाना होतानाही डॉ. समर्थ यांच्या अडचणी कमी झाल्या नाही. शहरातील या प्रतिभावान सायकलपटूने पुणे ते नागपूर परतीचा मार्ग गाठताना एकूण २७०० किलोमीटरचा प्रवास केवळ ६ दिवसांमध्ये पूर्ण केला.
अनोख्या सायकल प्रवासादरम्यान त्यांना अनेक चाहत्यांकडून पुढील वर्षी होणाऱ्या ‘रेस अक्रॉस अमेरिका’ या शर्यतीसाठी शुभेच्छा मिळाल्या.
दरम्यान, ‘रेस अक्रॉस अमेरिका’ या शर्यतीची तयारी करण्यासाठी डॉ. समर्थ रोज ४०० किलोमीटरचा सायकल प्रवास करीत आहे, हे उल्लेखनीय. जगातील ही सर्वांत चर्चेत असलेली सायकल शर्यत ४८०० किलोमीटर अंतराची आहे. जर ही शर्यत पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले तर अशी कामगिरी करणारे एकमेव भारतीय ठरतील. ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही सायकल शर्यत निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास डॉ. अमित समर्थ यांनी व्यक्त केला. प्रो. हेल्थ फाऊंडेशनचे संस्थापक व संचालकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. समर्थ यांना या मोहिमेत प्रवीण थाटे, गौरव मिराशी आणि हैदराबादचे श्रीकांत विश्वनाथन यांच्याकडून पूर्ण सहकार्य लाभले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
‘रोमांचक अनुभव’
अडचणींवर मात करीत मोहीम पूर्ण करणाऱ्या डॉ. अमित समर्थ यांनी हा अनुभव अनोखा व रोमांचक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘लोकमत’सोबत बोलताना समर्थ म्हणाले,‘माझे लक्ष्य ‘रेस अक्रॉस अमेरिका’ असल्यामुळे अशी मोहीम आवश्यक होती.
ते म्हणाले,‘रेस अक्रॉस अमेरिका या शर्यतीत रोज ४२० किलोमीटरचे अंतर पूर्ण करावे लागते. आम्ही रोज ५०० किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी १८ ते २० तास सायकलिंग केली.’
२७०० किलोमीटर अंतर पूर्ण करताना आलेले अनुभव सांगताना डॉ. समर्थ म्हणाले,‘अडचणी होत्या. सुरुवातीपासून सातत्याने पावसाने पिच्छा पुरवला. काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीचे आणि वादळी वाऱ्यांचे आव्हान पेलावे लागले. हा अनुभव भविष्यात नक्कीच उपयुक्त सिद्ध होईल. या अनुभवामुळे माझ्यात कणखरता आलीच सोबतच टीमच्या क्रू मेंबर्ससाठीही ही मोहीम संस्मरणीय ठरली.’