स्थायी समितीत गाजणार खड्डे
By Admin | Updated: February 5, 2015 01:13 IST2015-02-05T01:13:22+5:302015-02-05T01:13:22+5:30
विकासाच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असतानाच केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थायी समितीत गाजणार खड्डे
विरोधकांचा आंदोलनाचा इशारा : ४ जी चे खड्डे धोकादायक
नागपूर : विकासाच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त असतानाच केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या संदर्भात सदस्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी असल्याने हा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत गाजण्याचे संकेत समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी बुधवारी दिले. दरम्यान विरोधी पक्षाने याच मुद्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बोरकर यांच्या प्रभागात केबल टाकण्यासाठी मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अपघातही वाढलेले आहेत. आधीच दुरुस्तीसाठी निधी नाही. त्यातच खोदकामामुळे रस्ते पुन्हा नादुरुस्त होत असल्याचे चित्र आहे . हा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करून आयुक्तांना निर्देश देणार असल्याचे बोरकर म्हणाले..
नियम धाब्यावर बसवून रहदारीच्या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांच्या निदर्शनास ही बाब आणली होती. झिंगाबाई टाकळी व आजूबाजूच्या परिसरातील काम बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु अद्याप हे काम सुरू असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते विकास ठाकरे यांनी दिली.
खासगी कंपन्यांना काम दिले जाते. परंतु मनपाचे त्यावर नियंत्रण राहात नाही. ४ जी केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. यावर मनपा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. ही बाब आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास आणू. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करू , असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
रात्रीला खोदकाम
केबल टाकण्याला होत असलेला नागरिकांचा विरोध विचारात घेता रात्रीच्या सुमारास खोदकाम केले जाते. या संदर्भात लक्ष्मीनगर झोनचे सभापती गोपाल बोहरे यांनी आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
आयुक्त बैठकीत व्यस्त
या संदर्भात एक नगरसेवक आयुक्तांना भेटण्यासाठी आले असता त्यांना आयुक्त बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भेटीचे कारण विचारण्यात आले. नंतर प्रतिसाद मिळाला नाही.