विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

By Admin | Updated: August 20, 2016 02:24 IST2016-08-20T02:24:02+5:302016-08-20T02:24:02+5:30

गणेशोत्सव तोंडावर आहे. मात्र, विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुका निघणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे विघ्न आहे

Pothole Breakdown on Visharjan Marg | विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

विसर्जन मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

महापालिकेला आली जाग : २ सप्टेंबरपर्यंत खड्डे भरण्याचे निर्देश
नागपूर : गणेशोत्सव तोंडावर आहे. मात्र, विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुका निघणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे २ सप्टेंबरपर्यंत भरा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले आहेत. सोबत विसर्जन मार्गावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी महापौर प्रवीण दटके यांनी गणेशोत्सवाच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली. तीत उपमहापौर सतीश होले, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थापत्य समिती सभापती सुनील अग्रवाल, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या निर्देशानुसार यावेळी गणेश मंडळांना विविध प्रकारची परवानगी घ्यायची आहे. त्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे मुख्यालय तसेच टाऊन हॉलमध्ये ही व्यवस्था केली जाईल. महापौर दटके यांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक झोनमध्ये उपलब्ध असलेल्या कृत्रिम टाक्या, सिमेंट टाक्या तसेच कृत्रिम तलावांची माहिती घेतली. (प्रतिनिधी)

आजारांप्रति जागरुकता
या वेळी गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध आजारांप्रति जागरुकता निर्माण केली जाईल. वृक्ष संवर्धन, कृत्रिम तलाव विसर्जन, विसर्जन, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, ऊर्जा बचत, स्वच्छता मोहीम आदींबाबत माहिती दिली. त्याच प्रकारे प्रकार डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू पासून बचावाचे उपाय सुचविणारे बॅनर पोस्टर गणेश मंडळांमध्ये लावले जाईल. प्रत्येक झोनमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन मंडळांना पुरस्कृत केले जाईल.
मोठ्या मूर्तींचे विसर्जन पाचगावमध्ये
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पर्यावरण पूरक गणपती संकल्पनेला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. मोठ्या मूर्तींचे विसर्जन पाचगांव येथे करता येईल का, याची माहिती घेण्याचे निर्देश दिले. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी टोल फ्री नंबर देऊन लहान प्रतिमा व गणेश मूर्तीचे निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्याची सूचना केली.

 

Web Title: Pothole Breakdown on Visharjan Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.