उपसरपंच पदाचा तिढा सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:32+5:302021-04-18T04:08:32+5:30
कळमेश्वर : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून जिल्ह्यात आदर्श निर्माण करणाऱ्या ग्रामपंचायत सोनपूर (आदासा) येथे उपसरपंच पदाचा तिढा मात्र अद्यापही ...

उपसरपंच पदाचा तिढा सुटता सुटेना
कळमेश्वर : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून जिल्ह्यात आदर्श निर्माण करणाऱ्या ग्रामपंचायत सोनपूर (आदासा) येथे उपसरपंच पदाचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे. तर दुसऱ्या वेळेस उपसरपंच पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत एकही उमेदवारी अर्ज आला नसल्याने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली, अशी माहिती अध्यासी अधिकारी दीपक जंगले यांनी दिली.
तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोनपूर (आदासा) या ग्रामपंचायतसाठी तीन वॉर्डांतून सदस्यांसाठी निवडणूक झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्यांसाठी तीनही वॉर्डांतून नऊच अर्ज दाखल झाल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. यामध्ये वॉर्ड क्रमांक १ मधून नीलेश कडू, लिना कडू, नीता जिचकार, वॉर्ड क्रमांक २ मधून अक्षय धुर्वे, नीतू सहारे, अल्का पडोळे, वॉर्ड क्रमांक ३ मधून चेतन निंबाळकर, शिल्पा पडोळे, सुरेखा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यानंतर सरपंच म्हणून नीतू सहारे व उपसरपंच म्हणून नीलेश कडू निवडून आले होते. परंतु नीलेश कडू यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले. यामुळे १२ एप्रिलला दुसऱ्यांदा उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. परंतु या वेळी उपसरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने निवडणूक रद्द करण्यात आली. सध्या तरी उपसरपंच पदाचा तिढा सुटला नसून बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर उपसरपंच पदासाठी बिनविरोध उमेदवार का देऊ शकत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.