पोस्ट विभाग बदलतोय, मात्र सेवेचे काय?

By Admin | Updated: October 10, 2015 03:13 IST2015-10-10T03:13:01+5:302015-10-10T03:13:01+5:30

फेसबुक, वॉट्सअ‍ॅप व मोबाईलमुळे चुटकीसरशी संदेश पाठविणे शक्य झाले आहे. ई-मेलने महत्त्वाचा कागदही त्वरित जातो.

Post department changes, but what about service? | पोस्ट विभाग बदलतोय, मात्र सेवेचे काय?

पोस्ट विभाग बदलतोय, मात्र सेवेचे काय?

बँकिंगसोबत आॅन लाईनची धडपड : खेड्यापाड्यात पोहचलेलं एकमेव नेटवर्क
निशांत वानखेडे  नागपूर
फेसबुक, वॉट्सअ‍ॅप व मोबाईलमुळे चुटकीसरशी संदेश पाठविणे शक्य झाले आहे. ई-मेलने महत्त्वाचा कागदही त्वरित जातो. त्यामुळे एकेकाळी लोकांची पत्रे आणणारा पोस्टमनदादा, पूर्वीसारखा सुखदु:खाचा सोबती राहिला नाही. पोस्टमनच्या झोळीतील पूर्वीसारखे आंतरदेशीय आणि पोस्टकार्डचे प्रमाण कमी झाले आहे, तो कुरीयर बॉय झाला आहे.
त्यामुळे येणाऱ्या पिढीला पोस्टमन हा ऐतिहासिक पात्रासारखा चित्रात दाखवावा लागेल असे बोलले जात आहे. मात्र देशभरातील खेड्यापाड्यात पोहचलेलं एकमेव नेटवर्क पोस्टाचे आहे. याचा फायदा घेतला तर हे चित्र बदलू शकते. आतातर पोस्टाने बदलत्या काळाशी जुळवून अनेक नवनवीन लोकोपयोगी उपक्रम सुरू केले आहेत. मात्र यासोबतच पोस्टाच्या मूळ संदेशवहनाच्या सेवेतही गतिमानता आली तर या खात्याचे महत्त्व अधिकच वाढेल.
पोस्ट खात्याने आता स्पर्धेच्या काळात आपल्या सेवेचा विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी पोस्टाची बचत ठेव योजना चालायची. आतातर पोस्टाने बँकिंगच्या क्षेत्रात धाडसी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. भारतीय डाक विभाग, क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक चंद्रकांत गोड््डे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर डिव्हीजन(विदर्भ)मध्ये १३ मुख्य कार्यालय आणि ३९५ उपकार्यालय आहेत.
यापैकी १२७ पोस्ट आॅफिस कोअर बँकिंगशी जोडली आहेत. उर्वरित आॅफिस नोव्हेंबर अखेरपर्यंत जोडली जातील, असा विश्वास आहे. १६ एटीएमही तयार आहेत. हे काम झाले, पोस्टात बँकिंगची सेवा सुरू करण्यात येईल.
यात सर्व व्यवहार बँकेसारखेच होतील. त्यापुढच्या काळात ही सेवा इतरही बँकेशी जोडली जाणार आहे.

सुकन्या योजनेत पोस्टाची बाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत पोस्टाने बाजी मारली आहे. घोषणा झाल्यानंतर फेब्रुवारी २०१५ पासून आतापर्यंत विदर्भात ८६ हजार ४९२ लोकांनी आपल्या लेकीची खाती पोस्टात उघडली आहेत. यात नागपूर शहरात ११ हजार ३३४ खाती उघडली गेली आहेत. ही अतिशय फायदेशीर योजना असून तुमच्या मुलीचे वय १० वर्षाखाली असेल तर सुकन्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय कायालयाच्या पोस्ट मास्टर जनरल मरीअम्मा थॉमस यांनी केले.

मूळ सेवा मात्र दुर्लक्षितच
डाक विभाग आपल्या कार्याचा विस्तार करीत असला तरी संदेशवहनाच्या मूळ सेवेतील अडचणी मात्र कायम आहेत. किंबहुना पारंपरिक पोशाखातला पोस्टमन आज अधिक अडचणींना तोंड देत आहे. सर्वात मोठी अडचण मनुष्यबळाचीच आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर रिजनमध्ये शहरातील २४ पोस्ट आॅफिस आहेत. यात आजच्या घडीला ३२८ पोस्टमन कार्यरत आहेत.
आॅनलाईचीही धडपड
कोअर बँकिंगसोबतच सर्व पोस्ट आॅफिसेस आॅनलाईन करण्याचे कामही जोरात सुरू आहेत. लवकरच मुख्य कार्यालयांचे संगणकीकरण होत आहे. यासोबतच खेड्यापाड्यात असलेले आॅफिसही आॅनलाईन होणार आहेत. नागपूर विभागाचा विचार केल्यास, २०१८ पर्यंत विदर्भातील २४७४ पोस्ट आॅफिस आॅनलाईन करण्यात येणार असल्याचे गोड््डे यांनी स्पष्ट केले.
नवीन भरतीच झाली नाही
माहितीनुसार गेल्या ४० वर्षांपासून या पोस्टमनला वाटून दिलेला परिसर(बीट एरिया) बदलला गेला नाही. शहर वाढत आहे व इमारतीही वाढल्या आहेत. बीट एरिया वाढल्याने पोस्टमेनला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सभोवताल वाढत असलेल्या शहराचा भारही तेवढ्याच मनुष्यबळावर चालत आहे. दुसरीकडे येणारे पत्र वेळेवरच मिळेल, याचा विश्वास आजही लोकांमध्ये निर्माण झाला नाही. त्यामुळेच की काय, शहरात कुरियरवाल्यांचे आॅफिसेस झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे पारंपारिक सेवेत गतिमानता आली तर पोस्टाचा विश्वासही वाढेल.
पोस्टमेनच्या अडचणी
पोस्टमेनजवळ आता लोकांची पत्र नसली तरी, कुरियर मात्र आहे. हे कुरियर घरोघरी वाटताना अनेक अडचणी आहेत. कुत्र्यांची भीती नेहमीचीच झाली आहे. पोस्टमेनला कुत्रा चावल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. कुरियरवर बरोबर पत्ता नसल्यानेही शोधाशोध करावी लागते. अनेकवेळा मोबाईल नंबर नमूद नसला की, त्रास होतो. आधीसारखा जीवाभावाचा सोबती राहिला नसल्याने शहरातील घरात शिरताना लोकांची हेटाळणीही सहन करावी लागते.

Web Title: Post department changes, but what about service?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.