‘पोश्टर बॉईज’च्या चमूची धम्माल

By Admin | Updated: July 18, 2014 01:03 IST2014-07-18T01:03:20+5:302014-07-18T01:03:20+5:30

फनी गेम्सच्या माध्यमातून क्षणाक्षणाला निर्माण होणारा हास्यकल्लोळ, विविध स्पर्धेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतानाच ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटातील कलावंतांनी केलेली धमाकेदार एन्ट्री,

Poshter Boys' Team Dhammal | ‘पोश्टर बॉईज’च्या चमूची धम्माल

‘पोश्टर बॉईज’च्या चमूची धम्माल

रंगलेला ‘वन मिनिट शो’: लोकमत युवा नेक्स्ट व सोमलवार निकालस महिला महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम
नागपूर : फनी गेम्सच्या माध्यमातून क्षणाक्षणाला निर्माण होणारा हास्यकल्लोळ, विविध स्पर्धेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असतानाच ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटातील कलावंतांनी केलेली धमाकेदार एन्ट्री, त्यानंतर कलावंतांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद, गाण्याचे सादरीकरण, विद्यार्थ्यांसोबत केलेले नृत्य आणि टाळ्यांची साद अशा माहोलमध्ये उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाने सर्वांच्या मनात घर केले. निमित्त होते लोकमत युवा नेक्स्ट व सोमलवार निकालस महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पोश्टर बॉईज’च्या चमूशी धम्माल करण्याची व ‘वन मिनिट गेम शो’ खेळण्याच्या संधीची.
गुरुवारी, सोमलवार निकालस महिला महाविद्यालय, खामला येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अँकर, शुभम केचे याच्या ‘वन मिनिट गेम शो’ने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबतच शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वय आणि पद विसरून, मिळून सर्वांनीच साद घालत या ‘शो’ची रंगत लुटली. दोन तासांहून अधिक काळ रंगलेल्या हंशा, टाळ्या आणि फुल टू धमाल, असेच चित्र होते.
या ‘शो’मध्ये ‘आर्म रेसलिंग’, ‘टंग टिष्ट्वस्टर’, टिकली गेम, बॉलिवूड इन्फॉर्मेशन, थर्माकोल हेराफेरी आणि शिक्षकांसाठी ‘सेफ्टी पिनचा हार’ या अशा फनी गेम्सचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेगणिक विद्यार्थिनींचा सहभाग वाढत गेला.
या स्पर्धेत प्रत्येक जण मनसोक्त दंगले. यातच ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटातील श्रेयस तळपदे, हृषिकेश जोशी, समीर पाटील, पूजा सामंत, अनिकेत विश्वासराव व दीप्ती तळपदे यांचा प्रवेश होताच एकच जल्लोष झाला. त्यांच्या धमाकेदार एन्ट्रीपासून तर त्यांनी संवाद साधलेला प्रत्येक क्षण आठवणीत राहणारा असा होता.
चित्रपटातील ‘क्लायमॅक्स’ नागपुरात
अभिनेता श्रेयसने अभिनयाबरोबर चित्रपट निर्माता म्हणूनही आता पदार्पण केले आहे. त्याने निर्मित केलेला ‘पोश्टर बॉईज’ या मराठी चित्रपटाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तो म्हणाला, हा चित्रपट संपूर्ण कुटुंबानी एकत्र येऊन बघण्यासारखा आहे. सरकारी नसबंदीच्या जाहिरातीवर छापलेल्या फोटोवरून उडालेली धम्माल या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘क्लायमॅक्स’ नागपुरात घडतो.
अनिकेत म्हणाला, या चित्रपटातील गावरान भूमिका सादर करताना खूप मजा आली. प्रत्येकाने पहावा असा हा चित्रपट आहे. पूजा म्हणाली, नागपूर ‘रॉकिंग’ आहे. येथे जे प्रेम मिळते ते कुठेच मिळत नाही. ऋषिकेश म्हणाला, या चित्रपटात माझी प्राथमिक शिक्षकाची भूमिका आहे. मनोरंजनाची हमखास हमी हा चित्रपट देतो.
दरम्यान या सर्व चमूचे स्वागत ‘लोकमत’तर्फे करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सोमलवार निकालस महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा सोमलवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन लोकमत इव्हेन्टस्च्या नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)
‘पर्यावरण’ पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांंना पुरस्कार
या चित्रपटाला घेऊन लोकमत बालविकास मंचच्यावतीने ‘पर्यावरण’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. याचे बक्षीस वितरण अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांमध्ये सोमलवार निकालस, सोमलवार स्कूल रामदासपेठ, गायत्री कॉन्व्हेंट, दौलतराव ढवळे हायस्कूल, सत्यसाई कॉन्व्हेंट, संजुबा हायस्कूल, टिळक विद्यालय, हिंदू मुलींची शाळा, हिंदू ज्ञानपीठ महाल, डीएव्ही हायस्कूल, संस्कार विद्यासागर आणि शाहू गार्डन येथील प्रत्येक दोन उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Web Title: Poshter Boys' Team Dhammal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.