कुलींचे आंदोलन; प्रवाशांची गैरसोय
By Admin | Updated: May 30, 2015 02:58 IST2015-05-30T02:58:37+5:302015-05-30T02:58:37+5:30
विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघातील कुलींनी शुक्रवारी नागपूर रेल्वेस्थानकावर काम बंद आंदोलन केले. दरम्यान आंदोलनामुळे दिवसभर रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली.

कुलींचे आंदोलन; प्रवाशांची गैरसोय
नागपूर : विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघातील कुलींनी शुक्रवारी नागपूर रेल्वेस्थानकावर काम बंद आंदोलन केले. दरम्यान आंदोलनामुळे दिवसभर रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली.
सेंट्रल रेल्वे भारवाहक संघातर्फे आयोजित काम बंद आंदोलनाचे नेतृत्व भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद यांनी केले. कुलींनी काम बंद केल्यामुळे कडक उन्हात रेल्वे प्रवाशांना आपले सामान स्वत: उचलून नेण्याची पाळी आली. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. आंदोलनादरम्यान कुलींनी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वर रॅली काढली. त्यानंतर सर्व कुली बांधवांनी स्टेशन व्यवस्थापक दिनेश नागदिवे यांच्या चेंबरसमोर धरणे आंदोलन सुरू केले. प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे स्टेशन व्यवस्थापक दिनेश नागदिवे यांनी अब्दुल माजिद आणि इतर पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आपल्या कक्षात बोलविले. परंतु दोन वेळा चर्चा होऊनही कोणताच तोडगा निघाला नाही. कुलींच्या प्रलंबित असलेल्या बिल्ला ट्रान्सफर करण्याच्या फाईल्सचा निपटारा करणे, दोन वर्षांपासून कुलींना गणवेश देण्यात आला नाही तो त्वरित द्यावा, कुलींना ग्रुप डी मध्ये नोकरी द्यावी, कुली मनोज वासनिकने इतर कुली आणि प्रवाशांशी केलेल्या मारहाणीसाठी त्याचा बिल्ला रद्द करावा, आदी मागण्या लावून धरल्या. चर्चा निष्फळ ठरत असल्याचे पाहून स्टेशन व्यवस्थापक नागदिवे यांनी अब्दुल माजिद यांची वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर यांच्याशी मोबाईलवरून चर्चा घडवून आणली. डॉ. देऊळकर यांनी बिल्ला ट्रान्सफर, गणवेश, नोकरीबाबतच्या मागण्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. कुली मनोज वासनिकचा बिल्ला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आश्वासन त्यांनी कुलींना दिले. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर दुपारी कुलींनी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)