गरीब मजूर दहशतीत
By Admin | Updated: November 14, 2015 03:13 IST2015-11-14T03:13:44+5:302015-11-14T03:13:44+5:30
एका गरीब मजुराचे घर हडपण्यासाठी त्याला व त्याच्या पत्नीला रोज मारहाण केली जात असल्याचा प्रकार नारा रोड वेदनगर येथे उघडकीस आला आहे.

गरीब मजूर दहशतीत
घर हडपण्याचा प्रकार :
जरीपटका पोलीस आरोपीच्या पाठीशी
नागपूर : एका गरीब मजुराचे घर हडपण्यासाठी त्याला व त्याच्या पत्नीला रोज मारहाण केली जात असल्याचा प्रकार नारा रोड वेदनगर येथे उघडकीस आला आहे. पीडित दाम्पत्याने जरीपटका पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस आरोपीच्या पाठीशी असल्याने मजूर दाम्पत्य दहशतीत जगत आहेत.
झनक चंदन वघारे (३२) रा. वेदनगर असे पीडित मजुराचे नाव आहे. चंदन हा बांधकाम मजूर आहे. घरी पत्नी व लहान मुलगी आहे. मागील ११ वर्षांपासून चंदन या परिसरात राहतो. दरम्यान त्याने सुशीला तिवारी यांच्याकडून प्लॉट विकत घेतला. त्यावर घर बांधून तो राहत आहे. परंतु मागील दीड महिन्यांपासून त्याच्या शेजारी राहणारे उमेश मिश्रा व त्याची पत्नी आरती मिश्रा यांनी झनकला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. तो राहत असलेले घरावर आपली मालकी सांगून त्यांना त्रास देणे सुरू केले. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले परंतु शेजारी दाम्पत्यांनी आपली हद्द ओलांडली. ते झनकसह त्याच्या पत्नीला व मुलीलाही त्रास देऊ लागले. रोज भांडण करून वाद घालू लागले.
इतकेच नव्हे तर घराबाहेर आग लावण्याचाही प्रयत्न केला. पत्नीला मारहाणही केली. त्यामुळे झनकने जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. परंतु सुरुवातीला पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुन्हा तक्रार केली. परंतु कारवाई झाली नाही. तीन वेळा तक्रार देऊनही पोलीस या गरीब मजूर दाम्पत्याकडे लक्ष देत नसल्याने ते दहशतीत जगत आहेत. या गरीब मजूर दाम्पत्यांनी लोकमतमध्ये येऊन आपली व्यथा मांडली. या गरीब दाम्पत्याच्या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्यास एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)