Polyvenum instead of 'Antivenum'; The mortality rate decreased | ‘अँटीव्हेनम’ऐवजी ‘पॉलीव्हेनम’; मृत्यू दर घटला
‘अँटीव्हेनम’ऐवजी ‘पॉलीव्हेनम’; मृत्यू दर घटला

ठळक मुद्देमेडिकलमध्ये ११ महिन्यात १८ रुग्णांवर उपचार

राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन वर्षात सापाने चावा घेतल्याच्या घटनात कमालीची घट झाली आहे. सोबतच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पॉलीव्हेनम आहे. पूर्वी सापाने चावा घेतल्यानंतर अँटीव्हेनम लावण्यात येत होते. परंतु अलिकडच्या काळात अँटीव्हेनमच्या ठिकाणी पॉलीव्हेनम रुग्णांना दिल्या जात आहे. यात सापाची ओळख पटविण्याची गरज नसते. रुग्णाची स्थिती आणि विष पसरल्याच्या आधारावर पॉलीव्हेनमचा डोज देण्यात येत असून साप चावलेल्या रुग्णांवर योग्य उपचार होऊ लागले आहेत. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात साप चावलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात. सन २०१६ मध्ये ३१७ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ९० जणांचा मृत्यू झाला. सन २०१९ मध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत १८ रुग्ण उपचारासाठी आले असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला. पॉलीव्हेनमच्या वापरामुळे प्रभावी उपचार करणे शक्य झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांनी असे पॉलीव्हेनम विकसित केले आहे जे कोणताही विषारी साप चावल्यानंतर दिल्या जाऊ शकते. त्याचे फायदेही दिसू लागले आहेत. त्याच धर्तीवर आता मेडिकल कॉलेजमध्येही पॉलीव्हेनम रुग्णांना देण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते विदर्भात आढळून येणाऱ्या ८० ते ८५ टक्के साप विषरहित असतात. तर १५ ते २० टक्के सापच विषारी असतात. त्यात कोबरा, व्हायपर, क्रेट मुख्य विषारी साप आहेत. हे साप चावल्यानंतर दहा मिनिटात उपचार करणे आवश्यक असते, नाहीतर विष शरीरात पसरून रुग्णाला बरे करणे कठीण होते. शेतात काम करणाºया शेतकऱ्यांना तसेच मजुरांना साप चावण्याचे प्रमाण अधिक आहे.

त्वरित देतात पॉलीव्हेनम
मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले की, साप चावल्यानंतर त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहेत. रक्त वाहण्यासोबतच विषही शरीरात पसरते. कोबरा, व्हायपर, क्रेट हे साप चावल्यानंतर रुग्णांची अवस्था बिकट होते. पूर्वी सापाची ओळख केल्यानंतर अँटीव्हेनम देण्यात येत असे. परंतु आता पॉलीव्हेनम आले आहे. साप चावल्याचा रुग्ण येताच त्याला पॉलीव्हेनम देण्यात येते. साप विषारी असल्यास पॉलीव्हेनम लावण्यात येते. पॉलीव्हेनममुळे साप चावल्याचा उपचार सोपा झाला आहे. रुग्णांमध्ये दिसणाºया लक्षणांच्या आधारावर इतर उपचारही देण्यात येतात. मेडिकलमध्ये पुरेसे पॉलीव्हेनम उपलब्ध आहेत.
मेडिकलमध्ये पुरेसा साठा
मिळालेल्या माहितीनुसार मेडिकलमध्ये १२० व्हॉयल पॉलीव्हेनम उपलब्ध आहेत. येथे येणाºया रुग्णांच्या तुलनेत हा साठा पुरेसा आहे. गरजेनुसार या साठ्यात वाढ करता येऊ शकते.

Web Title: Polyvenum instead of 'Antivenum'; The mortality rate decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.