‘पॉलि’चे ‘टेक्निक’ बिघडणार
By Admin | Updated: July 4, 2014 01:09 IST2014-07-04T01:09:18+5:302014-07-04T01:09:18+5:30
अभियांत्रिकी शाखेप्रमाणेच पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थितीदेखील अतिशय विदारक झालेली आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी एका आठवड्यात केवळ १८ टक्के अर्ज आले आहेत.

‘पॉलि’चे ‘टेक्निक’ बिघडणार
पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया : केवळ १८ टक्केच अर्ज दाखल
नागपूर : अभियांत्रिकी शाखेप्रमाणेच पॉलिटेक्निक प्रवेशाची स्थितीदेखील अतिशय विदारक झालेली आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी एका आठवड्यात केवळ १८ टक्के अर्ज आले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ जुलै असून, आतापर्यंत फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने रिक्त जागा नेमक्या कशा भरायच्या, असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहणार आहे.
२७ जूनपासून पॉलिटेक्निकच्या ‘आॅनलाईन’ प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. नागपूर विभागातील सर्व ७१ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,६५५ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी बुधवारपर्यंत केवळ ४,४८९ अर्ज आले होते व याची टक्केवारी काढली असता ती अवघी १८ टक्के आहे. पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी याकरिता दोन वर्षांअगोदर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाची मर्यादा ३५ टक्क्यांवर घसरविण्यात आली होती. मात्र तरीदेखील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यास विभागाला अपयश आलेले आहे. पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमाचे भरमसाट शुल्क भरूनदेखील विद्यार्थ्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही.
अनेकांना तर कॅम्पस मुलाखतींदरम्यान १० हजारांच्या आतीलच नोकरी देण्यात आली होती. यामुळेच ३५ टक्क्यांची आॅफरदेखील फ्लॉप झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता रिकाम्या जागा भरायच्या कशा, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा झाला आहे. (प्रतिनिधी)