वेमुलाच्या आत्महत्येवरून होणारे राजकारण दुर्दैवी
By Admin | Updated: January 23, 2016 03:04 IST2016-01-23T03:04:24+5:302016-01-23T03:04:24+5:30
हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अतिशय दु:खद आहे.

वेमुलाच्या आत्महत्येवरून होणारे राजकारण दुर्दैवी
‘अभाविप’ने केली डाव्या पक्षांची निंदा : घातपाताची शंका
नागपूर : हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना अतिशय दु:खद आहे. परंतु या माध्यमातून होणारे राजकारण आणखी दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन ‘अभाविप’ पदाधिकाऱ्यांनी केले आहे. रोहितची आत्महत्या हा घातपाताचा प्रकार तर नव्हे, अशी शंका ‘अभाविप’चे राष्ट्रीय महामंत्री श्रीहरी बोरीकर यांनी उपस्थित केली.
‘अभाविप’तर्फे या मुद्यावर शुक्रवारी सकाळी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरून देशात राजकारण पेटले असून सामाजिक दरी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डावे पक्ष वातावरण बिघडविण्याचे काम करीत आहेत. विद्यापीठातील देशद्रोही कारवायांबद्दल बंडारू दत्तात्रेय यांच्यासोबतच काँग्रेस खासदार हनुमंत राव यांनीदेखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र पाठवले होते. परंतु, त्याचा उल्लेख टाळला जात आहे हे आश्चर्यजनक आहे. रोहितने आत्महत्या केली की, त्याच्यापुढे तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली याचा शोध घेणे आवश्यक आहे. यामागे घातपातदेखील असू शकतो, अशी शक्यता बोरीकर यांनी बोलून दाखविली.(प्रतिनिधी)
न्यायालयीन चौकशीची
केली मागणी
रोहितच्या आत्महत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ‘अभाविप’तर्फे करण्यात आली. विशेष म्हणजे त्यानंतर काही वेळातच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. न्यायालयीन चौकशीतून आत्महत्येसंदर्भातील विविध पैलू तसेच ‘आंंबेडकर स्टुडंट असोसिएशन’ची भूमिका याबाबतीत अनेक बाबी उलगडतील, असे बोरीकर म्हणाले.
देशद्रोह्यांचे समर्थन का?
‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’च्या माध्यमातून हैदराबाद विद्यापीठात सक्रिय असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि विद्यापीठात ‘बीफ फेस्टिव्हल’ आणि ‘महिषासूर-डे’ असे कार्यक्रम सुरू केले होते. त्यानंतर दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीला त्यांनी विरोध सुरू केला. या संघटना ‘आंबेडकर स्टुडंट असोसिएशन’ देशद्रोह्यांचे समर्थन करीत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली डावे आणि संबंधित संघटना देशद्रोह्यांचे समर्थन करीत असेल तर ‘अभाविप’ला त्यावर भाष्य करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का, असा प्रश्नदेखील बोरीकर यांनी उपस्थित केला.