‘प्रभारी’ मुद्यावरून राजकारण तापले
By Admin | Updated: February 13, 2015 02:14 IST2015-02-13T02:14:31+5:302015-02-13T02:14:31+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर पदांची भरती अद्यापही रखडली आहे. या पदभरतीवरून विद्यापीठात दोन गट निर्माण झाले असून ....

‘प्रभारी’ मुद्यावरून राजकारण तापले
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर पदांची भरती अद्यापही रखडली आहे. या पदभरतीवरून विद्यापीठात दोन गट निर्माण झाले असून ‘प्रभारी’ मुद्याला समोर करून यावर राजकारण करण्यात येत आहे. नवीन कुलगुरू येण्याअगोदर ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर ही पदभरती करण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार राज्यपाल कार्यालयाला करण्यात आली होती. यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाने विद्यापीठाला काही मुद्यांवर विचारणा केली आहे. परंतु पदभरती थांबवा, असे या पत्रात कुठेही नमूद नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाने २०१३ साली ५६ शिक्षकेतर रिक्त पदांसाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या पदभरतीसाठी मुलाखतीच झाल्या नाहीत. दरम्यानच्या काळात रोस्टरमध्ये बदल, मराठा-मुस्लिम आरक्षण मंजुरी, स्थगिती असे अनेक बदल घडले.
विद्यापीठात लवकरच नवीन कुलगुरू येणार आहेत. शिवाय कुलसचिव डॉ. गोमाशे हेदेखील ३१ मार्च रोजी पद सोडणार आहेत. अशा स्थितीत ही पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी, असा आग्रह विद्यापीठातील एका गटाकडून धरण्यात येत आहे. जुन्याच दिशानिर्देशांनुसार पदभरती व्हावी अशी मागणीदेखील करण्यात आली तर एका गटातर्फे नवीन दिशानिर्देशांप्रमाणे नव्याने जाहिरात काढण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. यामुळे नव्या उमेदवारांना संधी मिळेल, असा युक्तिवाद करण्यात येत आहे.
यातूनच ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांनी पदभरती करण्याची आवश्यकता काय व प्रशासनाला इतकी घाई का झाली आहे अशा आशयाची तक्रार एका गटाकडून राज्यपालांकडे करण्यात आली होती.
यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाने काही मुद्यांवर विद्यापीठाकडे विचारणा केली आहे. परंतु पदभरती थांबविण्यात यावी किंवा पुढे ढकलण्यात यावी असे कुठेही म्हटलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.