नागपुरात चढला राजकीय रंग; खोपडेंच्या बेंचवर पेंट मारून टाकले वंजारींचे नाव, पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 01:47 PM2022-06-08T13:47:35+5:302022-06-08T17:19:21+5:30

आपण लावलेल्या बेंचेसवर वंजारी यांचे नाव टाकणे याचा अर्थ बोगस बिल काढण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खोपडे यांनी तक्रारीत केली आहे.

Political war between krushna khopde and abhijit wanjari in East Nagpur amid NMC election | नागपुरात चढला राजकीय रंग; खोपडेंच्या बेंचवर पेंट मारून टाकले वंजारींचे नाव, पोलिसात तक्रार

नागपुरात चढला राजकीय रंग; खोपडेंच्या बेंचवर पेंट मारून टाकले वंजारींचे नाव, पोलिसात तक्रार

googlenewsNext

नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पूर्व नागपुरात राजकीय रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. शांतीनगर, प्रेमनगर भागात आपल्या आमदार निधीतून लावण्यात आलेल्या बेंचवर पेंट मारून, नाव मिटवून आ. अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आल्याची तक्रार आ. कृष्णा खोपडे यांनी शांतीनगर पोलिसात केली आहे. याप्रकरणी झोनचे कंत्राटदार राजूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही खोपडे यांनी केली आहे.

खोपडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रेमनगर व शांतीनगर या भागात माझ्या आमदार निधीतून नागरिकांसाठी बसण्याकरिता लोखंडी बेंच लावण्यात आलेले आहे. सतरंजीपुरा झोनचे अधिकारी ड्यूटी ऑफिसर राजूरकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कंत्राटदार यांनी त्या सर्व बेंचवर पेंट मारला. काही बेंचवर आ. अभिजित वंजारी यांचे नाव लिहिल्याची तक्रार आपल्याकडे तुषार ठाकरे यांनी मोबाईलवरून केली. तसेच पेंट मारणाऱ्या कंत्राटदारालाही त्यांनी पकडले. कंत्राटदाराशी मोबाईलवरून संवाद साधला असता झोन क्र. ७ चे राजूरकर यांनी सर्वच बेंचवर पेंट मारण्याची सूचना दिली, असे कंत्राटदाराने सांगितले.

या कंत्राटदाराला कामाची वर्कऑर्डरसुद्धा दिलेली नाही. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे कुणाचीही परवानगी नसताना अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कोणत्या अधिकारात पेंट मारण्यास सांगितले. आपण लावलेल्या बेंचेसवर वंजारी यांचे नाव टाकणे याचा अर्थ बोगस बिल काढण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खोपडे यांनी तक्रारीत केली आहे.

मी चिंधीचोरी करीत नाही : वंजारी

मी अशी चिंधीचोरीची कामे कधी करीत नाही. कुठल्याही अधकारी किंवा कंत्राटदाराला दुसऱ्याच्या बेंचवर पेंट मारून माझे नाव टाकण्यास मी सांगितले नाही व सांगणारही नाही. माझा स्वत:चा आमदार निधी मी जनसेवेसाठी वापरत आलो आहे. गरज भासली तर महाविकास आघाडी सरकारकडून आणखी निधी खेचून आणेन, अशी प्रतिक्रिया आ. अभिजित वंजारी यांनी याप्रकरणी लोकमतशी बोलताना दिली. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केली तर आपल्याला हरकत नाही. फक्त चौकशी निष्पक्ष व कुणीतरी आरोप करतो म्हणून दबावाखाली होऊ नये, अशी भूमिकाही वंजारी यांनी मांडली.

Web Title: Political war between krushna khopde and abhijit wanjari in East Nagpur amid NMC election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.