राजकीय भोंगे खणखणणार; नेतेमंडळी लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 21:04 IST2022-05-14T21:03:44+5:302022-05-14T21:04:09+5:30

Nagpur News नागपूर शहरातील चौकाचौकात लवकरच राजकीय भोंगे खणखणणार आहेत. नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी आढावा बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

Political horns will ring; The leadership started working | राजकीय भोंगे खणखणणार; नेतेमंडळी लागली कामाला

राजकीय भोंगे खणखणणार; नेतेमंडळी लागली कामाला

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नेतेमंडळींसह इच्छुकही जोमाने कामाला लागले आहेत. शहरातील चौकाचौकात लवकरच राजकीय भोंगे खणखणणार आहेत. नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सज्ज करण्यासाठी आढावा बैठकांचे सत्र सुरू केले आहे, तर इच्छुक उमेदवारांनी पुन्हा एकदा प्रभागातील वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिर, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड वितरण शिबिर लावण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर मनपाची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपली

- नागपूर महपालिकेची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांची राज्य सरकारतर्फे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता मनपाचा पूर्ण कारभार प्रशासनाच्या हाती आहे.

- १२ नगर परिषदा व एका नगरपंचायतीचीही निवडणूक

नागपूर जिल्ह्यात नरखेड, मोवाड, काटोल, कळमेश्वर-ब्राह्मणी, मोहपा, सावनेर, खापा, रामटेक, कामठी, उमरेड, वाडी, वानाडोंगरी या १२ नगर परिषदा व भिवापूर नगरपंचायतीची मुदत संपली आहे. त्यामुळे येथेही निवडणुकीचा फड रंगणार आहे. या सर्व ठिकाणी तीन ते चार महिन्यांपूर्वी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने वळविण्यासाठी स्थानिक आमदार व राजकीय नेते सक्रिय झाले आहेत.

भाजपला सत्तेखाली खेचणार 

गेल्या १५ वर्षांत भाजपने महापालिका पोखरून टाकली आहे. अनेक घोटाळे करून जनतेवर कर लादण्याचे काम केले आहे. यावेळी काँग्रेस जनतेचे मुद्दे घेऊन मैदानात उतरेल व भाजपची सत्ता उलथून टाकली जाईल.

- आ. विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

 

विजयाचा चौकार मारणार 

- ज्येष्ठ नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने नागपूरच्या विकासाचा मार्ग सुकर केला आहे. त्यामुळे यावेळीही नागपूरकर विरोधकांच्या विखारी प्रचाराला बळी न पडता भाजपची साथ देतील. भाजप विजयाचा चौकार मारेल.

- आ. प्रवीण दटके, शहर अध्यक्ष, भाजप

 

मनपावर भगवा फडकेल 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य विकासाच्या दिशेने जात आहे. याची छाप नागपूरकरांवरही पडली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना प्रत्येक वॉर्डात काम करीत आहे. गेल्या वेळी शिवसेना कमी जागा जिंकली असली तरी यावेळी शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकलेला दिसेल.

- प्रमोद मानमोडे, महानगर प्रमुख, शिवसेना

 

राष्ट्रवादीशिवाय महापौर बसविणे कठीण

- राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करीत आहे. भाजपने केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर मांडत आहे. जनसेवेसाठी वॉर्डांमध्ये पक्ष कार्यालये उघडली जात आहेत. या कामाची नागपूरकर दखल घेतील व राष्ट्रवादीलाच पसंती देतील. राष्ट्रवादीशिवाय महापौर बसविणे काँग्रेसलाही शक्य होणार नाही.

- दुनेश्वर पेठे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 

Web Title: Political horns will ring; The leadership started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.