हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:50 PM2019-10-05T23:50:33+5:302019-10-05T23:52:06+5:30

मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.

This is a policy that leads to religious and mental slavery: Kamaltai Gawai | हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला धम्म मेळाव्यात नवीन शिक्षण धोरणावर चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कोणत्याही काळात महत्त्वाचे असते कारण शिक्षणामुळेच माणसात निर्भयता व स्वतंत्रवृत्ती निर्माण होते. मात्र शासनाने आणलेले नवीन शिक्षण धोरण हे विपरीत आहे. मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.
६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि महिला संघटनेच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित महिला धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी वक्ता म्हणून वंदना वनकर तसेच डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्षा सुषमा भड, छाया खोब्रागडे, वंदना जीवने प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. कमलताई म्हणाल्या, मानवी मूल्य ही तथागत बुद्धाच्या केंद्रस्थानी होते. शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाला अनुरूप मानवी मूल्य रुजविणे गरजेचे आहे. मात्र नवे शिक्षण धोरण धार्मिक मूल्य रुजविणारे आहे, ज्यात धर्मनिरपेक्षतेला पायदळी तुडविले जात आहे. हिंदू धर्म व संस्कृतीला अनुकूल करून धर्माची मानसिक गुलामी विद्यार्थीदशेपासून लादली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
वंदना वनकर यांनी नव्या शिक्षण धोरणातील अनेक तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. हे धोरण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमुक्त व गरिबांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी शाळा बंद करून शिक्षणात खासगीकरणाला चालना देण्यात येत आहे. पारंपरिक सण, संस्कृतीचा आदर्श जोपासण्याच्या नावावर वर्णव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न या धोरणातून केला जात आहे. पुरातन काळातील गुरुकुल पद्धती आदर्श असण्याचा उल्लेख करून शिक्षणातून जातीभेदाचा पुरस्कार करण्यात येत आहे. पुरुषसत्ताक जातीव्यवस्थेला बळकट करून स्त्रियांची गुलामगिरी अधिक घट्ट करण्यात येत असल्याचा आरोप करीत हे धोरण म्हणजे जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा व गुलामगिरीचा जाहीरनामाच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
छाया खोब्रागडे यांनी धोरणातील भाषिक तरतुदींवर विचार मांडले तर डॉ. सरोज आगलावे यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाच्या प्रयत्नाकडे लक्ष वेधले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन शामला वाघधरे यांनी तर संघमित्रा नगरकर यांनी आभार मानले. सविता कांबळे, सुजाता लोखंडे, मायाताई थोरात आदींचा सहभाग होता.

Web Title: This is a policy that leads to religious and mental slavery: Kamaltai Gawai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.