पोह्याने खाल्ली पोलिसाची नोकरी

By Admin | Updated: July 15, 2016 02:58 IST2016-07-15T02:58:50+5:302016-07-15T02:58:50+5:30

पोहेवाल्याने नाश्त्याचे पैसे मागितले म्हणून दुखावलेल्या पोलिसांनी त्याला कायद्याचा बडगा दाखवत नऊ हजार रुपये उकळले.

Policity job | पोह्याने खाल्ली पोलिसाची नोकरी

पोह्याने खाल्ली पोलिसाची नोकरी

एक निलंबित : तिघांची उचलबांगडी, पोलीस दलात खमंग चर्चा
नागपूर : पोहेवाल्याने नाश्त्याचे पैसे मागितले म्हणून दुखावलेल्या पोलिसांनी त्याला कायद्याचा बडगा दाखवत नऊ हजार रुपये उकळले. संतापलेल्या पोहेवाल्याने नंतर त्या पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले तर, तिघांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्याची नोकरी खाणाऱ्या या पोहा प्रकरणाची पोलीस दलासह सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.
घटना दोन आठवड्यांपूर्वीची आहे. लोकेश दिनेश तुमडाम (वय २२) याची रामदासपेठ चौकात चहा-नाश्त्याची टपरी आहे. परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सीताबर्डी पोलिसांचा बंदोबस्त होता. बंदोबस्तातील चार पोलीस कर्मचारी लोकेशच्या टपरीवर गेले. त्यांनी गरमागरम पोहे अन् तर्रीचा आस्वाद घेतला. बिल झाले १०५ रुपयांचे. त्यातील काही पैसे देऊन पोलिसांनी लोकेशच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकेशने चहा-नाश्त्याच्या पूर्ण पैशाची मागणी केली आणि ते घेतलेही. पोलीस असल्याचे सांगूनही एका टपरीवाल्याने निर्ढावलेपणाने आपल्याकडून नाश्त्याचे पैसे घेतल्याची बाब पोलिसांना जिव्हारी लागली. त्यांनी त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार १० जुलैला हवालदार सुनील म्हस्के, गजानन निशितकर, अजय थूल आणि अंकुश घाटी हे चौघे पोलीस पुन्हा लोकेशच्या टपरीवर गेले आणि त्याला टपरी बंद करण्यास सांगून ठाण्यात नेले. तुझी तक्रार आहे, असे म्हणत त्याच्यावर कारवाईचा बनावही केला. तुला कोठडीत घालतो, अशी धमकीही दिली. हादरलेल्या लोकेश आणि त्याच्या काकाने पायापोटी लागून कारवाई करू नका, अशी आर्जव केली. तर, कारवाई टाळण्यासाठी त्यावेळी पोलिसांनी १५ हजारांची मागणी केली. ९ हजारात तडजोड झाल्यानंतर लोकेश घरी परतला. पोलिसांनी झटक्यात ९ हजार रुपये हडपल्याने संतप्त झालेल्या लोकेशने मित्राची मदत घेत १३ जुलैला सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याची वार्ता सर्वत्र पोहचली. पत्रकारांनी ही बाब उचलून धरली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत सीताबर्डी ठाणे गाठले. एसीपी वाघचौरे यांनी तक्रारकर्त्यांसोबतच हवालदार सुनील म्हस्के, गजानन निशितकर, अजय थूल व अंकुश घाटी या चौघांचे बयान नोंदविले. या प्रकरणात म्हस्के यांना निलंबित केल्याची चर्चाच आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत निलंबन आदेश निघाला नव्हता किंवा लेखी स्वरूपात तसे कळविले नव्हते.(प्रतिनिधी)

रक्कम स्वीकारणारा निलंबित
या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित होताच सकाळपासून पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. ९ हजारांची रक्कम म्हस्के यांनीच स्वीकारल्याचे लोकेशने लेखी आणि तोंडी तक्रारीत सांगितल्यामुळे तसा चौकशी अहवाल वाघचौरे यांनी वरिष्ठांना दिला. त्या आधारे गुरुवारी सायंकाळी हवालदार सुनील म्हस्के यांना निलंबित करण्यात आले तर, निशितकर, थूल आणि घाटी या तिघांची सीताबर्डी ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलाला जबर हादरा बसला असून, पोह्याने पोलिसांची नोकरी खाल्ल्याची चर्चा अनेकांसाठी झणझणीत ठरली आहे.

 

Web Title: Policity job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.