आजारी मुलीला घेऊन जाणा-या पालकाला पोलिसांची मारहाण, दोषी वाहतूक पोलिसांची बदली
By Admin | Updated: April 19, 2017 19:59 IST2017-04-19T19:59:25+5:302017-04-19T19:59:25+5:30
शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई जोरात सुरू आहे. हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकांचे मोबाईलवर फोटो काढून त्यांना ई-चलान पाठविले जात आहे.

आजारी मुलीला घेऊन जाणा-या पालकाला पोलिसांची मारहाण, दोषी वाहतूक पोलिसांची बदली
>
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 19 - शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई जोरात सुरू आहे. हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकांचे मोबाईलवर फोटो काढून त्यांना ई-चलान पाठविले जात आहे. शहरात सर्वत्र हा प्रकार सुरू असतांना काही पोलीस कर्मचारी या हेल्मेट सक्तीच्या माध्यामातून वसुली मोहीमही करीत आहे. याचे ताजे उदाहरण इंदोरा चौकात पाहायला मिळाले. आजारी मुलीला तातडीने रुग्णालयात घेऊन जात असलेल्या एका पालकासोबत दोन वाहतूक पोलिसांनी हेल्मेटच्या नावावर चालान कारवाई करण्यासाठी वाद घातला. इतकेच नव्हे तर मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सोळंकी आणि पोलीस शिपाई बाबु सिंग असे त्या वाहतूक पोलीसांची नावे आहेत. गेल्या १२ एप्रिल रोजी दुपारी १ ते १.३० वाजता इंदोरा चौक येथे ही घटना घडली. अनिल धानोरे असे पीडिताचे नाव आहे. धानोरे हे दुपारी आपल्या आजारी मुलीला रुग्णालयात घेऊन जात होते. घाईघाईत त्यांनी हेल्मेट घातला नव्हता. इंदोरा चौकात त्यांना सोळंकी आणि बाबू सिंग यांनी रोखले. त्यांना कागदपत्राची मागणी केली. तेव्हा सध्या आपल्याकडे नाही. मुलीची प्रकृती बरी नसल्याने तिला रुग्णालयात तातडीने घेऊन जात असल्याचे कारण सांगितले. परंतु पोलीस कर्मचारी ऐकायला तयार नव्हते. ते चालान कारवाई करू लागले. धानोरे यांनी पुन्हा विनंती केली. मात्र पोलीस ऐकायलाच तयार नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
हेल्मेट न घालणा-या वाहन चालकांचे फोटो काढून त्यांना ई-चालान पाठवण्याचे निर्देश असतांनाही वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कृत्याची वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक सोळंकी यांची तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष आणि बाबुसिंग यांची पोलीस मुख्यालयात बदली केली. तसेच या दोघांचीही पुढील वेतनवाढ थांबविण्याची शिक्षा प्रस्तावित केली.
हेल्मेट सक्तीच्या नावावर वसुली-
पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्तांनी हेल्मेटबाबत करवाई करीत असतांना हेल्मेट न घालणा-या वाहन चालकांचे फोटो काढून त्यांना ई-चालान पाठविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतांनाही काही वाहतूक पोलीस वसुली करीत आहेत. ही घटना याचे चांगले उदाहरण आहे.