लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आता शहरात जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, यानुसार सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या ट्रकला आउटर रिंगरोडचाच वापर करावा लागणार आहे. त्यांना शहरात येता येणार नाही. या निर्बंधांमुळे वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. ८ सप्टेंबरपासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असेल अधिसूचनेनुसार मोठे ट्रक, ट्रेलर, डंपर, कंटेनर आदी वाहनांना शहराच्या मुख्य रस्त्यांवर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच प्रवेश करता येईल. याव्यतिरिक्त त्यांना प्रवेश करता येणार नाही. इतवारी, कळमना, एफसीआय गुदाम, रेल्वे मालधक्का, संत्रा मार्केट, लालगुदाम, गांधीबाग येथे दररोज जड वाहनांनी मोठ्या प्रमाणावर माल येतो. मात्र आता या जड वाहनांना विशिष्ट मार्गाचा वापर करून ठरावीक वेळेतच जाता येणार आहे.
नियम तोडला तर १० हजारांचा दंड
- नागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने विविध राज्यांतून दुसऱ्या राज्यांत जाणारे ट्रक्स व इतर जड वाहने शहरातून जातात. मात्र अशा ट्रकला आता थेट आउटर रिंग रोडने जावे लागणार आहे. त्यांना शहरात प्रवेशबंदी राहणार आहे.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर साडेसातशे ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.
- पोलिस यंत्रणेला विशेष पथके तयार करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
जड वाहनांमुळे पाच वर्षांत ४५७ लोकांचा मृत्यू
जड वाहनांमुळे शहरात अनेक अपघात होतात. मागील पाच वर्षांत शहरात जड वाहनांमुळे ४२२ प्राणांतिक अपघात झाले व त्यात ४५७ लोकांचा मृत्यू झाला, तर साडेपाचशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
खालील जड वाहनांनाच परवानगी
- केंद्र शासन व राज्य शासन, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा परिषद किंवा इतर महामंडळाच्या मालकीची शासकीय कामासाठी फिरणारी वाहने.
- अग्निशमन दल, सैन्य दल तसेच केंद्र व राज्य शासनाचे पोलिस दलाचे जड वाहन.
- दूध, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी जड वाहने.
- प्रवासी वाहतूक करणारी शासकिय, सार्वजनिक वाहने. या सूचनांचे पालन अनिवार्य
- शासकीय कामात गुंतलेल्या जड वाहनांच्या चालकावर संबंधित कार्यालयीन प्रमुखाचे मूळ स्वरूपातील
- प्रमाणपत्र बाळगणे तसेच वाहनासमोर 'ऑन गव्हर्नमेंट ड्यूटी' लिहिणे.
शहराच्या हद्दीत ३० किलोमीटर प्रतितास वेगाची मर्यादा.