पोलीस वाहनेच सीटबेल्टविना

By Admin | Updated: April 5, 2016 05:07 IST2016-04-05T05:07:16+5:302016-04-05T05:07:16+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली

Police vehicles without seatbelt | पोलीस वाहनेच सीटबेल्टविना

पोलीस वाहनेच सीटबेल्टविना

सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीटबेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी ३६ हजार १०८ चालकांवर कारवाई केली. धक्कादायक म्हणजे, कायद्याच्या पालनासाठी कारवाई करणाऱ्या पोलीस खात्यात विनासीटबेल्टची ३५ टक्के वाहने आहेत. २०००सालातील ही वाहने अद्यापही कंडम करण्यात आलेली नाहीत.
सीटबेल्ट (सेफ्टीबेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला सीटबेल्ट बसवणं वाहन उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच नव्हे तर गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अपघात झालाच तरसीटबेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७० टक्के जास्त असते. याचे गांभीर्य आता ओळखून वाहतूक पोलीस विभागाने सीटबेल्ट कारवाईची मोहीम हाती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यात ३६ हजार १०८ चालकांवर सीटबेल्ट नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई करणारे बहुतांश पोलीसच सीटबेल्ट लावत नसल्याचे वास्तव आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी १०० या क्रमांकावर दूरध्वनी करून पोलीस वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करीत नसल्याची तक्रार केली. यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने अनेक जुन्या वाहनांना सीटबेल्टच नसल्याची माहिती दिली. या संदर्भात ‘लोकमत’ने अधिक माहिती जाणून घेतली असता, पोलीस खात्यात २००० सालातील २०५ वाहने आहेत.
ही वाहने निकामी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यातील ३५ टक्के वाहने अद्यापही रस्त्यावर धावत आहेत. परंतु या वाहनांमध्ये सीटबेल्टच नाही. परिणामी, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पोलिसांना विनासीटबेल्टमुळे आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.

सीटबेल्टची गरज काय?
४ कारची स्थिर वस्तूला अथवा दुसऱ्या वाहनाला धडक बसल्यानंतर अंदाजे एक दशांश सेकंदात कारची गती अचानक थांबते. ज्यांनी सीटबेल्ट लावलेला नाही ते प्रवासी जडत्वाच्या नियमानुसार कारच्या वेगाने जाऊन एखाद्या मानवी क्षेपणास्राप्रमाणे पुढील काच किंवा डॅशबोर्डवर आपटतात. गंभीर जखमी अथवा मृत्युमुखी पडतात.

Web Title: Police vehicles without seatbelt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.