पोलीस आत्महत्येत नागपूर राज्यात दुसरे
By Admin | Updated: May 5, 2015 02:02 IST2015-05-05T02:02:05+5:302015-05-05T02:02:05+5:30
राहुल अवसरे - नागपूर पोलीस आत्महत्येत नागपूर शहर संपूर्ण राज्यात दुसरे आहे. एकूण आत्महत्यांमध्ये ४३ टक्के आत्महत्यांचे कारण अज्ञात असून नऊ टक्के आत्महत्या या केवळ तणावातून झालेल्या आहेत.

पोलीस आत्महत्येत नागपूर राज्यात दुसरे
राहुल अवसरे - नागपूर
पोलीस आत्महत्येत नागपूर शहर संपूर्ण राज्यात दुसरे आहे. एकूण आत्महत्यांमध्ये ४३ टक्के आत्महत्यांचे कारण अज्ञात असून नऊ टक्के आत्महत्या या केवळ तणावातून झालेल्या आहेत. १९ टक्के आत्महत्या या गोळी झाडून झालेल्या आहेत. ही धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. ही माहिती २०१० ते २०१३ या चार वर्षातील आहे. २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये २८, २०१२ मध्ये २७ आणि २०१३ मध्ये सर्वाधिक ४३ , अशा एकूण १२९ आत्महत्येच्या घटना घडल्या. पोलीस आत्महत्येच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशात पहिल्या स्थानावर आहे.
शिपायांच्या अधिक आत्महत्या
राज्यात चार वर्षात घडलेल्या एकूण आत्महत्यांपैकी १०४ (८१.४२ टक्के) आत्महत्या या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर २५ (१९.३७ टक्के) आत्महत्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या आहेत. त्यात १ पोलीस अधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, ७ उपनिरीक्षक, ८ सहायक पोलीस उपनिरीक्षक , २३ हेड कॉन्स्टेबल, २८ पोलीस नायक शिपाई आणि ५३ पोलीस शिपायांचा समावेश आहे.
नागपुरात ११ आत्महत्या
पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी ५६ आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ७३ घटना घडल्या. त्यापैकी मुंबईमध्ये १८, नागपूर ११, पुणे ९, औरंगाबाद ६, ठाणे ४, मुंबई रेल्वे ३, अमरावती २, नवी मुंबई २ आणि नाशिकमध्ये १ घटना घडली. जिल्ह्याच्या ठिकाणी सातारा ७, यवतमाळ ६, पुणे ग्रामीण ५, अमरावती ग्रामीण ५, औरंगाबाद ग्रामीण, परभणी आणि गडचिरोलीत प्रत्येकी ४, अकोला, कोल्हापूर, बीड, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहमदनगर आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी ३, गोंदिया, हिंगोली, लातूर, नांदूरबार आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २, सिंधूदुर्ग, नागपूर ग्रामीण, जळगाव, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड आणि वाशिममध्ये प्रत्येकी १ घटना घडली.