पोलिसांचा दर्जा, सुरक्षा रक्षकाचे मानधन
By Admin | Updated: December 12, 2014 00:30 IST2014-12-12T00:30:04+5:302014-12-12T00:30:04+5:30
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करून जवानांना कायम करण्यात आले. त्यांना कालबाह्य शस्त्रे देऊन महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेची

पोलिसांचा दर्जा, सुरक्षा रक्षकाचे मानधन
जवानांमध्ये नाराजी : सुविधाही नसल्यामुळे होतेय गैरसोय
नागपूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करून जवानांना कायम करण्यात आले. त्यांना कालबाह्य शस्त्रे देऊन महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. यात जवानांना तुटपुंजे वेतन देण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलातर्फे विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
सुरक्षा जवानांच्या मोर्चाला पोलिसांनी मॉरिस कॉलेज टी पॉईंट येथे अडवून धरले. यावेळी जवानांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाची निर्मिती करण्यात आली. परंतु महामंडळ एका जवानामागे हजारो रुपये वेतन घेत असून जवानांना तुटपुंजे वेतन देण्यात येत आहे. पोलिसांप्रमाणेच या जवानांना काम करावे लागते, त्यांना शस्त्र वापरण्याचेही अधिकार आहेत. परंतु त्यांना कुठल्याच सुविधा देण्यात येत नाहीत. वेतन कमी, भत्ता नाही, वैद्यकीय सुविधाही देण्यात येत नसल्यामुळे असंतोष पसरला आहे.
नेतृत्व
अधिक चन्ने, श्रीकृष्ण बांगर, हरीश जाधव
मागण्या
पोलिसांप्रमाणे वेतन आणि इतर सुविधा द्या.
सुरक्षेसाठी आधुनिक शस्त्र पुरविण्यात यावे.
कायम सेवेत सामावून घ्यावे.
सुरक्षा रक्षक संबोधणे बंद करावे.